वाचनातून व्यक्तिमत्त्वही बहरते!

वाचनातून व्यक्तिमत्त्वही बहरते!

ठाणे - अभ्यासासह धम्माल, मस्ती करायला मुलांना आवडते. या वयात मुलांचा मनोरंजनात्मक माध्यमाकडे अधिक कल असतो. टीव्ही कलाकारांचीही माहिती हल्लीच्या मुलांना असते; मात्र यासोबत अवांतर वाचनही केले पाहिजे. त्यामुळे ज्ञान तर वाढलेच; शिवाय व्यक्तिमत्त्वही बहरेल. त्यामुळे वाचनावरही भर द्या, असा सल्ला अभिनेता पुष्कर श्रोत्री याने विद्यार्थ्यांना दिला.

‘सकाळ’च्या ज्युनिअर लीडर स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे येथील शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेत मंगळवारी (ता. २५) पुष्कर श्रोत्रीने विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुलांनी पुष्कर येताच जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या स्वागताने पुष्करही सुखावला. विद्यार्थी आता शांत बसतील असे वाटत असताना त्याने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात करताच त्यांनी पुन्हा जल्लोष सुरू केला. ‘मीही शाळेत अशीच मस्ती करण्याकरता प्रसिद्ध होतो,’ असे सांगत पुष्कर काहीतरी सांगतोय हे लक्षात आल्यावर विद्यार्थी ऐकू लागले. 

पुष्करने मुलांना हलके-फुलके प्रश्‍न विचारले. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त आवांतर वाचन करता का, या त्याच्या प्रश्‍नावर केवळ दोघांनीच होकारार्थी उत्तर दिले. त्यावर पुष्कर म्हणाला, की मुलांचे वाचन हल्ली खूप कमी झाले आहे. वाचत राहिले पाहिजे. त्यातून आत्मविश्‍वास वाढतो. कोणासमोर बोलताना अडखळणे, घाबरणे आदी समस्या वाचनामुळेच नाहीशा होतात. शब्दभांडार वाढतो. आवडत्या अभिनेत्याचा पहिला चित्रपट मुलांना माहीत असतो; मात्र देशाच्या पंतप्रधानाचे नाव अनेक मुलांना सांगता येत नाही. त्यामुळे वृत्तपत्रेही वाचायला हवीत. शाळेत केवळ मस्ती करून चालणार नाही, तर तुमच्यातील चांगल्या गुणांच्या जोरावर तुमची शाळेत वेगळी ओळख निर्माण व्हावी, असे काहीतरी करा. तुम्ही एक चूक कराल त्या वेळी इतर लोक ती चूक सतत उगाळत बसतील. चुका होणार नाहीत याकडे तुमचा कटाक्ष राहिला पाहिजे. केवळ सिनेसृष्टी आणि कलाकारांमध्ये अडकून न राहता अभ्यासावर जोर द्या, असेही पुष्कर म्हणाला.

मुलांना त्यांच्या आवडीनिवडी विचारल्यावर अनेकांनी दाखवलेल्या अंगभूत कलागुणांना पुष्करने दाद दिली. पवन या विद्यार्थ्याने वेगवेगळे स्टंट करून दाखवले. पुष्करने त्याला अभ्यासासह व्यायाम आणि योगासन प्रशिक्षणाचा सल्ला दिला. आपल्यातील कलेला शिक्षणाची जोड मिळाल्यास देशातच नव्हे तर परदेशातही नाव कमावण्याची संधी आहे, असे पुष्कर म्हणाला.

सेल्फीसाठी झुंबड!
पुष्करने विद्यार्थ्यांसोबत व्हिडीओ चित्रीकरण केले आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. सेल्फीसाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली होती. शाळेतील कन्नड आणि गुजराती भाषक विद्यार्थ्यांशी पुष्करने त्यांच्याच भाषेत संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी घेतली पुष्करची छोटीशी मुलाखत!
विद्यार्थी - तुम्हाला कोणते खेळ आवडतात? 
पुष्कर - लहानपणी सर्वच खेळ खेळायचो. मात्र आता तितके शक्‍य होत नाही. केवळ क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळतो.
विद्यार्थी - अभिनेते कसे बनलात?
पुष्कर - शाळेतील विविध कार्यक्रमांत सहभागी व्हायचो. महाविद्यालयात एकांकिका, नाटकांमध्ये भाग घेतला. त्यातून बक्षिसे मिळत गेल्यानंतर यातच करिअर करण्याचे ठरवले.
विद्यार्थी - पुढील वाटचाल काय?
पुष्कर - सध्या एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. १५ सप्टेंबरला तो प्रदर्शित होईल. १० मुलांना घेऊन ‘उबंतु’ हा चित्रपट मी बनवला आहे.

‘सकाळ’च्या ज्युनियर लीडर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतून मुलांना नक्कीच उपयुक्त माहिती वाचायला मिळणार आहे. यामुळे मुलांमधील जिज्ञासा जागृत होईल. 
- सुलेखा चव्हाण  (संचालिका, शिवाई विद्याप्रसारक मंडळ)

विद्यार्थ्यांसाठी अशा स्पर्धा आवश्‍यक आहेत. मुलांनी वाचन केले तरच पुढे व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होऊ शकतात. ‘सकाळ’ने सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. 
- रचना वेखंडे  (मराठी विभागप्रमुख,  शिवाई विद्याप्रसारक मंडळ)

ज्युनियर लीडर स्पर्धेतून विद्यार्थ्यांना विविध खेळांचीही माहिती मिळते. त्यातून खेळातील गोडी निर्माण होते. मैदानाची माहिती, खेळाचे नियम समजल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. 
- दीपक कट्टे  (मुख्याध्यापक, शिवाई विद्याप्रसारक, माध्यमिक विभाग)

‘सकाळ’ ज्युनियर लीडर स्पर्धा उत्तम आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होईल. मराठीसह इंग्रजी माध्यमाच्या मुलांनीही यात सहभागी व्हावे. सामान्यज्ञान वाढण्यासह मराठी भाषाही समृद्ध होईल. 
- मीना मानकर  (मुख्याध्यापिका, शिवाई विद्याप्रसारक, इंग्रजी माध्यम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com