संजीव जयस्वालांच्या बदनामीसाठी व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

आज आरोपपत्र
अटक आरोपींविरोधात गुरुवारी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. व्हिडीओद्वारे आयुक्तांवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे या व्हिडीओतील मुलीने पोलिसांना सांगितले होते. तसेच काही व्यक्तींनी असे बोलण्यास भाग पाडल्याचा खुलासाही तिने केला होता. त्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते.

ठाणे - महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात उलटसुलट विधाने करणाऱ्या मुलीचा वादग्रस्त व्हिडीओ काही महिन्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका लेडीज बारमालकाने आयुक्तांना मानसिक त्रास देण्यासाठी हा वादग्रस्त व्हिडीओ तयार करण्याकरिता पुढाकार घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी ‘रेडबुल’ आणि ‘आईना’ लेडीज बारचा मालक अश्‍विन शेट्टी याच्यासह त्याचा साथीदार संदीप गोंडुकुंबे याला अटक केली.

जयस्वाल यांनी बेकायदा लेडीज बारच्या विरोधात ठाण्यात जोरदार मोहीम उघडली होती. कोणत्याही दबावाला न जुमानता त्यांनी शहरातील सुमारे ५० लेडीज बार जमीनदोस्त केले होते.  एवढेच नव्हे, तर यापैकी काही बार चालकांनी पुन्हा लेडीज बार सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महापालिकेने या बारवर बुलडोझर चालवला. या कारवाईत अश्‍विन शेट्टी याच्या उपवन येथील ‘रेडबुल’ आणि उथळसर येथील ‘आईना’ हे लेडीज बार तोडण्यात आले होते. या रागातून त्याने संदीपच्या साथीने आयुक्तांचा बदनामीकारक व्हिडीओ तयार केला होता. यात एक मुलगी जयस्वाल यांच्या विरोधात उलटसुलट विधाने करीत असल्याचे दिसत होते. आयुक्तांनी स्वतः याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार करून या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आले. तपासात ‘तो’ व्हिडीओ केवळ आयुक्तांना बदनाम करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे खंडणी विरोधी पथकाने उघडकीस आणले. 

Web Title: thane news TMC Thane Municipal Commissioner Sanjeev Jaiswal