ठाण्यात महापालिकेचा आता 'टॉयलेट अधिकारी' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता महिलांच्या साह्याने राखण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी साफसफाईची कामे स्थानिक महिला गटांना देण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये, सामुदायिक शौचालयांची संबंधित विभागांनी पाहणी करून पाणी नळ जोडणी नाही, त्या ठिकाणी नळ जोडणी देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या उपनगर अभियंत्यांना दिले आहेत.

ठाणे : शहरातील सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांना नोव्हेंबरअखेर पाणी जोडणी, मलनि:सारण जोडणी आणि वीज जोडणी देण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. सरकारी कारभारानुसार केवळ सुरवातीला सुविधा दिल्यानंतर देखभाल केली जात नसल्याने या सुविधांवर देखरेख ठेवण्यासाठी एक "टॉयलेट अधिकारी' नेमण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याकडून दरमहा स्वच्छतागृहाची नियमित तपासणी केली जाणार आहे. 

सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता महिलांच्या साह्याने राखण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी साफसफाईची कामे स्थानिक महिला गटांना देण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये, सामुदायिक शौचालयांची संबंधित विभागांनी पाहणी करून पाणी नळ जोडणी नाही, त्या ठिकाणी नळ जोडणी देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या उपनगर अभियंत्यांना दिले आहेत. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी वीजपुरवठा देण्याची कार्यवाही विद्युत विभागाने करण्याची सूचना केली आहे. 

त्याचबरोबर मलनि:सारण विभागाने शहरातील सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहे मलनि:सारण वाहिन्यांनी जोडण्याची कार्यवाही करण्याची सूचना या विभागाला करण्यात आली आहे. अनेक वेळा स्वच्छतागृहात बांधकामांच्या समस्या येत असतात. अशा वेळी एकाच वेळी दुरुस्ती करण्याऐवजी बांधकाम विभागाने सर्व स्वच्छतागृहांची नियमित दुरुस्ती करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.