ठाण्यातील रस्ते होणार स्मार्ट

ठाण्यातील रस्ते होणार स्मार्ट

ठाणे - शहरात अनेक ठिकाणी अग्निशमन दल पोहचू शकत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रस्ते लवकरात लवकर रुंद करण्यात यावेत, अशी शिफारस पालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेने पाहणी अहवालात केली आहे. या संस्थेने शहरांतर्गत वाहतुकीचे डिजिटल नेटवर्किंग तयार केले आहे, त्यामुळे शहरात नवीन रस्ता किंवा उड्डाणपूल तयार करताना त्याचा फायदा होणार आहे.

शहरातील वाहतुकीचे सर्वेक्षण करून त्यावर आधारित नियोजन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिका व "मेड्युलासॉफ्ट टेक्‍नॉलॉजी व ट्रान्स्पोर्ट सिम्युलेशन सिस्टीम‘ स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने आकारास येत आहे. संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणात शहरातील 300 जंक्‍शनवर वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहेत. त्यातील 38 जंक्‍शनबाबत सिग्नल यंत्रणेपासून ते थेट वाहतूक बदलापर्यंतचे बदल सुचवले आहेत. याशिवाय सध्या शहरात मोठी गृहसंकुले आणि मॉलजवळ अग्निशमन यंत्रणा सहजासहजी पोहोचू शकत नसल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविले आहे. शहरातील अरुंद रस्ते, पार्किंगचा उडालेला बोजवारा आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेऊन या सर्वांचे म्हणजेच वाहतुकीचे भविष्यात योग्य नियोजन करण्यासाठी पालिकेने दोन वर्षांपासून सुरू केलेले सर्वेक्षण नुकतेच संपले. त्यात सध्याच्या वाहतुकीबरोबरच भविष्यात नव्याने होणारे रस्ते, उड्डाणपूल, येऊ घातलेले प्रकल्प आदींच्या दृष्टीने वाहतुकीचे आणि नागरी सुविधांचे नियोजन कसे असावे, याचे निरीक्षण नोंदवले आहे. शहरात मोठे मॉल्स आणि गृहसंकुले असून, या ठिकाणी 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाहनांची पार्किंग होते. या वाहनांना येण्या-जाण्याच्या मार्गात वाहतुकीचे नियोजन न केल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. भविष्यातील कोंडी टाळण्यासाठी सर्व रहिवासी आणि वाणिज्य स्वरूपातील इमारतींना वाहतुकीचे नियोजन लक्षात घेऊनच इमारतीचे प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी ठराव करण्याचा पालिकेचा विचार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

सर्व्हिस रोडचा प्रयोग फसला
मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्व्हिस रोड तयार करण्यात आले आहेत. अंतर्गत वाहतुकीसाठी या रोडचा वापर आवश्‍यक आहे; मात्र शहराच्या बाहेर जाणारी वाहने या रोडचा वापर करत असल्याने सर्व्हिस रोडला मुख्य रस्त्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडचा उद्देश फसला आहे.

बेस मॉडेल तयार
संस्थेच्या माध्यमातून शहरातील 38 जंक्‍शनचे व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून, या जंक्‍शनच्या ठिकाणी नव्या सुविधा, सध्याची परिस्थिती आदी बाबी लक्षात घेऊन काही बदल सुचवण्यात आले आहेत. यासाठी एक बेस मॉडेल तयार केले आहे. त्यानुसार नव्याने निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या ठिकाणी पार्किंग कशी असावी. इमारतींचे आणि मॉलचे आगमन, निर्गमन कसे असावे. सध्याच्या स्थितीत येथे काही बदल करता येऊ शकतात का? फायर ब्रिगेडची गाडी अगदी शेवटच्या संकुलापर्यंत जाण्यासाठी रस्ते कसे असावेत, याचा अंतर्भाव केला आहे.
 
38 जंक्‍शनमध्ये बदल
संस्थेने 38 जंक्‍शनचे सर्वेक्षण केले असले तरी शहरातील तीन हात नाका, नितिन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कळवा नाका, कॅसल मील आदींसह घोडबंदरचे काही महत्त्वाचे जंक्‍शन, वागळेचे काही जंक्‍शन अशा 38 जंक्‍शनच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणेत काही बदल करता येऊ शकतात का, याची चाचपणी केली. सर्व्हिस रोडला वाहतूक वळवणे, डिव्हायडर, ओपनिंग आणि एन्ड लेव्हलवर होणारे अपघात टाळण्यासाठी बदल, रस्त्यांची रुंदी वाढवणे, चौक रुंद करण्यासंबंधी महत्त्वाचे बदल सुचवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com