मध्य रेल्वेमार्गावरील १९ ठिकाणे जाणार पाण्यात!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल विस्कळित होऊ नये, म्हणून मध्य रेल्वेतर्फे पावसाळापूर्व जय्यत तयारी करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १९ ठिकाणे जलमय होणारी असून, त्याची खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली. आतापर्यंत नालेसफाई करून ९० हजार मीटर गाळ रेल्वेने काढला. 

मुंबई - रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल विस्कळित होऊ नये, म्हणून मध्य रेल्वेतर्फे पावसाळापूर्व जय्यत तयारी करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १९ ठिकाणे जलमय होणारी असून, त्याची खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली. आतापर्यंत नालेसफाई करून ९० हजार मीटर गाळ रेल्वेने काढला. 

जलमय होणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा करणारे मशीन बसवण्याबरोबरच झाडांच्या फांद्यांची छाटणी, नालेसफाई आदी उपाय केले जात आहेत. दर वर्षी पावसाळ्यात लोकल सेवेला मोठा फटका बसतो. रुळांवर पाणी साचल्याने लोकल पूर्णपणे ठप्प होतात. रेल्वेकडून पावसाळापूर्व तयारी करण्यात येते. यंदाही जय्यत तयारी करण्यात आल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. नुकतीच हार्बर रेल्वेवरील पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या नालेसफाईच्या कामांची पाहणी मुंबई पालिका आयुक्‍त अजोय मेहता आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केली. त्या कामाबाबत समाधान व्यक्‍त करतानाच पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहितीही देण्यात आली होती. यंदा मध्य रेल्वेने पावसाळ्यात पाण्यात जाणाऱ्या १९ ठिकाणी विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सर्व ठिकाणी मे अखेरपर्यंत पाणी उपसा करणारे २७ पंप बसवण्यात येतील. 

मुंबईतील १५ ठिकाणे
मुंबई पालिकेच्या अखत्यारित व हद्दीत असणाऱ्या; परंतु रेल्वे रुळांवर पाणी साचण्याचा धोका संभावणाऱ्या १५ ठिकाणी पालिकेकडूनही १६ पंप बसवण्यात येतील. सरदार वल्लभाई पटेल पूर्व दिशा, लोअर परळ, माझगाव यार्ड, मस्जिद बंदर, पूर्व दिशेला बर्कले हाऊस, भायखळ्यातील साईबाबा मंदिराजवळ, भायखळ्यातील रेल्वे पादचारी पुलाजवळ, चिंचपोकळी रेल्वेस्थानकाबाहेरील, परळ स्थानक, मुखगापाक नाला, सायन स्थानक, घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान २१/३ किमी, भांडुप फलाट क्रमांक १, नाहूर स्थानकाच्या पूर्व दिशेला आणि शिवडी स्थानक गेट नंबर ७ यांचा त्यात समावेश आहे. 

जलमय होणारी ठिकाणे
मुख्य मार्गावर मस्जिद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, सायन, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नानीपाडा, ठाणे आणि डोंबिवलीहार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, चुनाभट्‌टी आणि कोपरखैरणे  मुख्य मार्गाच्या दक्षिण पूर्वेकडील किमी ६५/७ सब-वे आणि ७५/१ सब-वे यांचाही समावेश

नालेसफाईचा पहिला टप्पा पूर्ण
मध्य रेल्वेने आपल्या उपनगरी सेक्‍शनमधील नालेसफाई करून जवळपास ९० हजार मीटर गाळ काढला. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील ७६ भूमिगत नाल्यांचीही सफाई केली. सफाईचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम ३१ मेपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. 

तत्पर रेल्वे प्रशासन 
नाल्यातील ९० हजार मीटर गाळ काढण्यात आला 
पावसाळ्यादरम्यान रेल्वे रुळांवर दरडी वा दगड येऊन बाधा निर्माण करणाऱ्या ६०४ ठिकाणांचा शोध घेऊन कामे पूर्ण 
पावसाळ्यात इंडिकेटर्सची समस्या उद्‌भवू नये म्हणून तांत्रिक कामे पूर्ण  
 सिग्नल यंत्रणा व्यवस्थित सुरू राहावी आणि पाणी तुंबून कोणतीही तांत्रिक समस्या उद्‌भवू नये, म्हणून मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणी ९५० डिजिटल एक्‍सेल काऊंटर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले