रवी पुजारी टोळीतील तीन गुंडांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मुंबई - रवी पुजारी टोळीतील तीन गुंडांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी (ता.12) कुर्ला येथून अटक केली. राज चौहान, अली अब्बास जाफर खान, सुधाकर सुंदर ख्रिस्तोपिया अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 7.65 बोअरचे पिस्तूल, दोन मॅगझीन, आठ जिवंत काडतुसे, अडीच लाख रुपयांची रोख रक्कम, तसेच दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना सोमवारपर्यंत (ता.15) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हे तिघे कुर्ला परिसरात येणार असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात विनोबा भावे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रवी पुजारीच्या सांगण्यावरून या तिघांनी गेल्या महिन्यात उल्हासनगरमधील एका वाईन शॉपच्या काउंटरवर चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठ्ठीच्या माध्यमातून पुजारीने खंडणीची मागणी केली होती. जाताना या तिघांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला होता.

गेल्या आठवड्यात या तिघांनी नालासोपारातील एका हॉटेलमध्ये घुसून तेथील व्यवस्थापकावर गोळीबार केला होता. खंडणीच्या वादातून हा प्रकार झाला होता. हा गोळीबार करण्यासाठी पुजारीने त्यांना पैसे दिले होते. या रकमेचे वाटप करण्याकरता ते तिघे शुक्रवारी कुर्ला परिसरात आले होते. तेथे ते नवीन कट रचणार होते, असे या तिघांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यांना लवकरच नालासोपारा आणि उल्हासनगरमधील हिललाईन पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

Web Title: three gund arrested in ravi pujari gang