अभिनयाने नाही जमले, तरी मदतीने फुलवले चेहऱ्यावर हास्य!

अभिनयाने नाही जमले, तरी मदतीने फुलवले चेहऱ्यावर हास्य!

संतोष भिंगार्डे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः कोरोना लाटेचा कमी-अधिक फटका सर्वांनाच बसला. हातावर पोट असणाऱ्यांची भूक भागवायची कशी आणि कोणी, असा प्रश्न होता. त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. त्यांपैकीच एक होता अभिनेता संदीप पाठक. गरजूंना अन्नाचे वाटप आणि रुग्णांसाठी रक्तदान शिबिरे घेऊन त्याने समाजसेवेचा वस्तुपाठच घालून दिला.

कोरोना अचानक आला आणि वेगाने घराघरांत पोहचला. जवळची माणसे हिरावून घेऊ लागला तेव्हा त्याचा धोका प्रकर्षाने जाणवला. अवघे जग जागच्या जागी थांबले आणि पोटापाण्याच्या बरोबरीने जीव वाचवण्याची धडपड सुरू झाली. ‘कोरोनायोद्ध्यां’च्या रूपात रस्त्यावर देवदूत फिरू लागले तेव्हा थोडे आशादायी चित्र निर्माण झाले. माझीही नाटक आणि चित्रपटाची कामे बंद असल्याने गरजूंच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलो. रक्तदान शिबिरे घेतली. बॅकस्टेज आर्टिस्टना मदत करण्यात खारीचा वाटा उचलला. मी केलेल्या कामांमुळे एकाच्या जरी जीवनात आनंद आला असेल, तरी भरून पावलो, अशी प्रतिक्रिया संदीपने व्यक्त केली.

लॉकडाऊनमुळे सततच्या धावपळीनंतर बऱ्याच काळानंतर कुटुंबासोबत एकत्र राहायला मिळाल्याचा आनंद होता; पण परिस्थिती चिंताजनक असल्याची जाणीव संदीपला झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणावर नागरिक रुग्णालयात दाखल होत होते. अनेकांचा जीव गेला. बोरिवलीतील एका ठिकाणी अन्नदान सुरू असायचे. संदीप त्यात सहभागी झाला. वयोवृद्धांना अन्नवाटप करायला लागला. होम क्वारंटाईन असलेल्या कोरोना रुग्णांना बिल्डिंगच्या खाली डबा पोहोचवण्याचे काम त्याने महिनाभर केले. दिवसाला आम्ही दोनशे ते अडीचशे जणांचे जेवण पाकिटात भरून त्यांच्यापर्यंत पोहोचवले, असे संदीप सांगतो.

नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केल्याने रक्तदान शिबिरे भरवली जात नव्हती. संसर्गाच्या भीतीने अनेकांच्या मनात रक्तदानाबाबत भीती होती. मात्र, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेल्यामुळे रक्ताची कमतरता जाणवू लागली. अशा वेळी संदीप पुढे सरसावला. त्याने टाटा रुग्णालय गाठले आणि आपला मेकअप मॅन व वाहनचालकाच्या जोडीने रक्तदान केले. इतरांनाही रक्त देण्यासाठी आवाहन केले. नाटक-चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळींनाही साद घातली. रक्तदानाचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातूनच आपणच रक्तदान शिबिर भरवायचे संदीपच्या डोक्यात आले. माजल गावातल्या तरुणांना सोबत घेऊन त्याने तिथे रक्तदान शिबिर भरवले. साधारण दीडशे जणांनी तिथे येऊन रक्तदान केले. ‘संदीप पाठक ओंढा नागनाथ’ नावाने एक फॅन क्लब आहे. १४ मे रोजी आपल्या वाढदिवशी संदीपने त्यांच्या मदतीने ओंढा नागनाथमध्ये रक्तदान शिबिर भरवले. तिथे जवळपास ८५ जणांनी रक्त दिले. हिंगोलीतील एका रक्तपेढीला ते देण्यात आले. संदीपच्या कामातून प्रेरणा घेत कल्याणमध्ये एका सोसायटीत मोठे रक्तदान शिबिर भरवण्यात आले. संदीपलाही बोलावण्यात आले होते. पुण्यातील एका शिबिरातही तो सहभागी झाला होता. सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमातून त्याने जनजागृती केली.
लोकांना मदत करणे माझे काम होते, ते मी केले. आपण सर्व तरुणांनी आता देशासाठी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. ते आपले कर्तव्य आहे, असे संदीप सांगतो.

रंगमंच कामगारांनाही मदत
संदीप पाठकने रंगमंच कामगारांनाही मदत केली. ‘कलाकार फॉर महाराष्ट्रा’ नावाचा आमचा एक ग्रुप आहे. त्यात आम्ही सर्व मराठी कलाकार मंडळी आहोत. आम्ही जमेल तसे पैसे गोळा करून बॅकस्टेज आर्टिस्टना मदतीचे किट वाटले. प्रत्येक कलाकाराने त्यासाठी योगदान दिले. सुरुवातीचे तीन ते पाच महिने आम्ही अशी मदत केली. यापुढेही आम्ही पडद्यामागील कलाकारांच्या पाठीशी आहोत. ते आहेत म्हणून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. साहजिकच आमच्या आयुष्यात त्यांचे स्थान मोलाचे आहे, असे संदीपने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com