वृक्षतोड करणाऱ्यांवर पालिकेची ‘सावली’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - वृक्षतोडीविरोधातील कायदा कठोर असला, तरी बेकायदा झाडे कापणाऱ्यांवर कारवाई करण्यास महापालिका अपयशी ठरत आहे. दोन वर्षांत शहरात बेकायदा वृक्षतोडीच्या ४८६ तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. त्यातील अवघ्या ८० प्रकरणांत पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत.

मुंबई - वृक्षतोडीविरोधातील कायदा कठोर असला, तरी बेकायदा झाडे कापणाऱ्यांवर कारवाई करण्यास महापालिका अपयशी ठरत आहे. दोन वर्षांत शहरात बेकायदा वृक्षतोडीच्या ४८६ तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. त्यातील अवघ्या ८० प्रकरणांत पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत.

कायदा कठोर असला, तरी कायद्याची अंमलबजावणी करणारे सक्षम असले पाहिजेत; अन्यथा चोरांना रान मोकळे असते. याचाच प्रत्यय मुंबई महापालिकेच्या वृक्षतोडीच्या कायद्यासंदर्भात अनुभवायला येत आहे. २०१४ ते २०१६ मध्ये बेकायदा वृक्षतोडीसंदर्भात महापालिकेकडे ४८६ तक्रारी आल्या. त्यातील अवघ्या २४ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले. ५६ प्रकरणांत अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. वृक्षतोड करणाऱ्यांना महापालिका कायद्यानुसार पाच हजारांचा दंड किंवा एक आठवड्यापासून एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. वृक्षतोडीसंदर्भातील महापालिकेचा कायदा कठोर असला तरी झाडे तोडण्याबाबतच्या तक्रारींची पालिकेकडून दखल घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. बोरिवलीतील आयसी कॉलनीत राहत असलेले केविन कुटिनो यांनी त्यांच्या सोसायटीतील बेकायदा वृक्ष छाटणीबाबत वर्षभरापूर्वी तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण सध्या महानगर दंडाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. केविन यांनी मागवलेल्या माहितीमध्ये सांताक्रूझ येथील गोळीबार मार्गावरील एका प्रकरणात पालिकेने कारवाईच केली नाही. महापालिका वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करत नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघडकीस आले आहे. कारवाई न करण्याबाबत पालिकेने पोलिसांनाच जबाबदार धरले आहे. 

पालिकेने तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाईसाठी विलंब होतो, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Tree cutting issue