बोगद्यासाठी झाडांची कत्तल 

बोगद्यासाठी झाडांची कत्तल 

नवी मुंबई - ऐरोली-काटई नाका बोगद्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील १२१ झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. १२.५ किलोमीटरच्या या मार्गासाठी आणखी काही झाडांचा बळी दिला जाणार आहे. या प्रकारामुळे नवी मुंबईतील वृक्षप्रेमी आणि सामाजिक संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. झाडे जगावायची नव्हती, तर ती लावलीच कशाला, असा सवाल त्यांनी केला आहे. 

विशेष म्हणजे या झाडांना महापालिकेने नोटिसा लावल्या असून एमआयडीसीच्या जागेवरील या झाडांची कापणी करण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाचा मनमानी कारभार उघड झाला आहे. काही दिवसांपूर्वी दिघा महात्मा फुलेनगर येथील झाडाची छाटणी करण्याची परवानगी दिली असताना ते बुंध्यासकट नष्ट केले. त्याच्या बदल्यात दुसरे झाड लावलेले नाही. हा प्रकार ताजा असतानाच दुसरीकडे ठाणे-बेलापूर मार्गावरील सिमेन्स कंपनीनजीक २०० मीटर परिसरात ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत लावण्यात आलेली आणि जुनी अशी १२१ झाडे तोडण्यात येणार असून ३४३ झाडांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या झाडांची छाटणी रस्त्यांसाठी आणि बोगद्यासाठी करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाने स्पष्ट केले आहे. 

या झाडांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर सात दिवसांत हरकती आणि सूचना पालिकेने मागविल्या आहेत. परंतु हा प्रकार एमआयडीसीच्या जागेवर सुरू असल्याने महापालिकेने एमआयडीसीला अंधारात ठेवत परस्पर या नोटिशी बजावल्या आहेत. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मागणीनुसार या झाडांची छाटणी करण्यात येणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. मात्र एमएमआरडीएनेही या प्रकल्पासाठी बाधित जागा आणि वृक्षांसंदर्भात कोणताही पत्रव्यव्हार केलेला नाही. या प्रकारामुळे नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. 

ऐरोली-काटई येथील मार्गासाठी एमएमआरडीएने पालिकेकडे या संदर्भात अर्ज केला होता. त्यानुसार महापालिकेने या झाडांच्या छाटणी व वृक्षस्थलांतरासाठी हरकती मागवल्या आहेत. सात दिवसांत त्या पाठवण्याची मुदत दिली आहे. हरकतीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. बाधित १२१ झाडांच्या बदल्यात ४०० झाडे लावून घेण्यात येणार आहेत.
- तुषार पवार, उपायुक्त, उद्यान विभाग, महापालिका

नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी रोपांची लागवड केली जाते; परंतु दुसरीकडे बेसुमार वृक्षतोड शहरात सुरू आहे. याबाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात येईल.
- संदीप ठाकूर, जनहित याचिकाकर्ता
 

पालिकेला जाब विचारणार
नवी मुंबईतील एमआयडीसीच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकाराचा विकास प्रकल्प निर्माण करत असताना एमआयडीसीची जागा बाधित होत असल्यास एमआयडीसीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ऐरोली-काटई नाका बोगद्यामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांसंदर्भात महापालिकेने या जागेवरील झाडे हटवण्याकरिता कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे महापालिकेला या प्रकरणी जाब विचारण्यात येईल, अशी माहिती एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com