सर्वोत्तम वाहनाचे मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

टाटा मोटर्स कंपनीचा नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न राहिला आहे. पुण्यातील कारखान्यात विशेषत: वाहनाच्या विविध प्रकारच्या डिझाईन्स, त्यांच्या चाचण्या आणि ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच सर्वोत्तम वाहनाचे मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राजेंद्र पेटकर यांनी दिली. 

पुणे - टाटा मोटर्स कंपनीचा नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न राहिला आहे. पुण्यातील कारखान्यात विशेषत: वाहनाच्या विविध प्रकारच्या डिझाईन्स, त्यांच्या चाचण्या आणि ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच सर्वोत्तम वाहनाचे मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राजेंद्र पेटकर यांनी दिली. 

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी आहे. पुणे शहराचे औद्योगिक शहर म्हणून ओळख होण्यास टाटा मोटर्स कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यामुळे पुण्यातील टाटा मोटर्सच्या वाहननिर्मितीच्या कारखान्यांतील विविध कामांच्या माहितीसाठी गुरुवारी कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी वाहननिर्मितीचे सादरीकरण करण्यात आले. येथील कारखान्यांत व्यावसायिक आणि प्रवासी वाहनाचे दिवसाला 100 हून अधिक प्रकारचे वाहनाचे मॉडेल तयार होतात. कारखान्यांत सुमारे 4500 ते 5000 कामगार कार्यरत असून कामगारांना वाहननिर्मितीचे पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे पेटकर यांनी सांगितले. 

टाटा कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डेमलर-बेंझ एजीच्या सहकार्याने 1954 मध्ये पहिले व्यावसायिक वाहन तयार केले. टाटा मोटर्सने 1991 मध्ये टाटा सिएराचे मॉडेल सादर करून प्रवासी वाहन बाजारपेठेत प्रवेश केला. त्यानंतर टाटा मोटर्सने अनेक नवनवीन मॉडेल तयार करून आंतराष्ट्रीय वाहननिर्मितीत भारताचा दबदबा वाढवला. जगातील सर्वांत स्वस्त अर्थात अवघ्या 1 लाख रुपयांत सर्वसामान्यांच्या स्वप्नातील टाटा नॅनो बाजारपेठेत आणून भारतीय वाहननिर्मितीत नवा प्रयोग केला. त्याची कौतुकास्पद दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. प्रसिद्ध लॅण्ड रोव्हर व जॅग्वार या ब्रिटिश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतल्यामुळे त्यांनी भारतीय वाहननिर्मितीत नवी ओळख निर्माण केली. टाटा मोटर्सने नेहमीच वाहनाचे डिझाईन आणि त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ग्राहकांना आम्ही नेहमीच कमीत कमी किमतीत चांगले वाहन देण्याचा प्रयत्न केल्याचे पेटकर यांनी सांगितले. 

टाटांची गृहिणींना साथ 
टाटा मोटर्स गृहिणी सोशल वेल्फेअर सोसायटीअंतर्गत विविध वस्तू तयार केल्या जातात. या उपक्रमांत फक्‍त महिलांचा सहभाग असतो. त्यात घरगुती पदार्थांत लोणचे, मसाले, पावडर, चटणी, भाजणी, खाद्यपदार्थांसह इतर वस्तूंचा समावेश आहे. शिवण विभागाच्यावतीने विविध प्रकारच्या बॅग्जही येथे तयार केल्या जातात. कुटुंबांसाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. 

 

Web Title: Try to build the best vehicle model