दोन्ही मंत्र्यांची हकालपट्टी करा - मलिक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

मुंबई - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्‍यातील रामचंद्र शिक्षण संस्थेच्या नानाभाऊ कोकरे आश्रमशाळेतील आदिवासी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विकास आणि महिला बालविकासमंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

आश्रमशाळेतील आदिवासी समाजाच्या काही मुलींवर गेल्या अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार होत होते. आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ते दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. नानाभाऊ कोकरे या अनुदानित आश्रमशाळेत जळगाव जिल्ह्यातील काही मुली शिक्षण घेत आहेत. या मुली दिवाळी सुटीच्या निमित्ताने गावी आल्या असताना एका मुलीच्या पोटात दुखू लागले. मुलीच्या पालकांनी डॉक्‍टरांकडे नेऊन तपासणी केल्यानंतर मुलीला गर्भधारणा झाल्याचे लक्षात आल्याने हे प्रकरण उघडकीस आले, अशी माहिती मलिक यांनी दिली. लैंगिक अत्याचाराचे प्रकरण अतिशय गंभीर असून, सरकारने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.