भाजप हा आयत्या बिळात नागोबा - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्र्यांबरोबर आयुक्तांची जवळीक 
ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी येथील पोलिस आयुक्तांना कळविण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावरून या दोघांतील जवळीक स्पष्ट होते, असे ठाकरे म्हणाले. महापालिकांत मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अधिकारी काम करीत असताना शिवसेना भ्रष्टाचार कसा करणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

ठाणे - शिवसेना पाच वर्षे मेहनत करते. या मेहनतीच्या जोरावर सत्तेत येते. या सत्तेत आयतेच सहभागी होण्याची सवय लागलेल्या भाजपच्या नागोबाने फणा काढला आहे. शिवसेनेला दंश करण्यासाठी उभा राहिलेला हा फणा शिवसैनिक ठेचून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 17) येथील सभेत दिला. भाजप हा गुंडांचा पक्ष झाल्याचा पुनरुच्चार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 

तलावपाळी येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी बगीचाशेजारी उद्धव ठाकरे यांची ही सभा झाली. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, महापौर संजय मोरे, राजेंद्र देवळेकर उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते कार्यालयांना टाळे लावून पळाले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी पाडणारे शिवसैनिक असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या शिवसैनिकांच्या अंगावर मुख्यमंत्र्यांनी गुंड सोडल्यास त्याला तोडीस तोड उत्तर दिले जाईल. या गुंडांचे हात त्यांच्या हातात दिल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही.'' 

सत्यनारायण पूजेला भाजपचे कार्यकर्ते गर्दी करतात, तर रक्तदान असलेल्या ठिकाणी शिवसैनिक रांगा लावतात, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिवसैनिकांच्या जोरावरच पंचवीस वर्षे भाजपला सत्तेत सहभागी होता आले. विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला संपविण्यासाठी विश्वासघाताने युती तोडल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. त्यामुळे महापालिकेत आम्ही आधीच युती तोडली. केवळ महापालिकेतच नव्हे, तर विधानसभेतही लवकरच भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला. 

देशाचे राष्ट्रपिता आपणच असल्याचे सांगण्यास नरेंद्र मोदी मागे-पुढे पाहणार नाहीत. जाहिरातबाजीवर त्यांनी आतापर्यंत अकराशे कोटी उधळल्याची टीका पंतप्रधानांवर केली. ठाण्यातील नागरिकांना गाजर देणारी टोळी नको तर दिलेला शब्द पाळणारे बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा वारसा सांगणारे लोक हवे आहेत, अशी भावनिक सादही त्यांनी नागरिकांना घातली. 

मुख्यमंत्र्यांचा गुंडांना लाल गालिचा 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील गुंडांची यादी पोलिसांकडे मागितली होती. गुंडांना तुरुंगात पाठवण्याची त्यांच्याकडून अपेक्षा होती; पण ते त्यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी लाल गालिचा अंथरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईला पाटण्याची उपमा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासण्याची वेळ आली आहे, अशी खिल्लीही उडवली. 

मुख्यमंत्र्यांबरोबर आयुक्तांची जवळीक 
ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी येथील पोलिस आयुक्तांना कळविण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावरून या दोघांतील जवळीक स्पष्ट होते, असे ठाकरे म्हणाले. महापालिकांत मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अधिकारी काम करीत असताना शिवसेना भ्रष्टाचार कसा करणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Uddhav Thackeray criticize BJP