ठाण्यातील जनतेसमोर झालो नतमस्तक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

ठाणे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ठाण्यावर प्रेम केले. तितकेच प्रेम ठाण्यातील जनतेनेही शिवसेनेवर कायम ठेवल्याने पुन्हा एकदा ठाण्यावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ठाण्यातील जनतेचे आभार कसे मानावेत, हे मला समजत नसून मी ठाण्यातील जनतेसमोर नतमस्तक झालो, ही भावना व्यक्त करण्यासाठीच मी आज ठाण्यात आलो आहे. लवकरच शिवसेनेकडून ठाण्यात विजयी मेळावा घेतला जाणार असून जाहीरपणे ठाण्यातील मतदारांसमोर नतमस्तक होणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.6) येथे सांगितले. 

भाजपच्या विजयाचा रथ ठाण्यात रोखणाऱ्या आणि एकहाती सत्ता मिळविणाऱ्या शिवसैनिकांचे कौतुक करण्यासाठी उद्धव ठाकरे खास ठाण्यात आले होते. मीनाक्षी शिंदे आणि रमाकांत मढवी यांची अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केवळ आपण ठाण्यावर बोलणार असून मुंबईतील विषय मुंबईत जाऊन बोलणार असल्याचे सांगत इतर राजकीय प्रश्‍नांना बगल दिली. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, आदित्य ठाकरे, रश्‍मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत आयुक्त उपस्थित राहिल्याने याची चर्चा झाली. विशेष म्हणजे या वेळी महापालिका आयुक्तांचा उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केल्याबद्दल सत्कारही केला. 

ठाण्यातील जनतेचे आभार तर मानतोच; मात्र विरोधकांनी उमेदवारी अर्ज घेऊन दिलेल्या पाठिंब्याबद्दल उद्धव यांनी विरोधकांचेही आभार मानले. भाजपलाही आपण विरोधक मानता का, या प्रश्‍नाला थेट उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले. आम्ही आमचा निर्णय घेतला असून आता त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे ते म्हणाले. ठाणे आणि शिवसेनेचे एक वेगळे नाते असून ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेला स्पष्ट कौल दिला आहे, असे सांगत त्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांचेही आभार मानले. त्यांच्यासारखे धडाडीचे आयुक्त ठाण्याला लाभले असून पाच वर्षांत विकासाचा हा धडाका असाच सुरू राहणार असल्याचे सूतोवाचही उद्धव यांनी दिले. 

Web Title: Uddhav Thackeray thane