महाराष्ट्राला दिशा दाखवणार उल्हासनगर पॅटर्न 

महाराष्ट्राला दिशा दाखवणार उल्हासनगर पॅटर्न 

उल्हासनगर - गोरगरीब विद्यार्थ्यांना समरसून अभ्यास करता यावा, एकाग्रतेने स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण केंद्र, प्रोजेक्‍टर रूमसारख्या सुविधा त्याच जागेवर असाव्यात, याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारी महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे साकारत आहे. एका अर्थाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ज्ञानसाधनेचा मंत्र तळागाळातील युवकांसाठी प्रत्यक्षात सहजसाध्य करून देणारा हा ‘उल्हासनगर पॅटर्न’ दिशादर्शक ठरणार आहे.  

ही प्रशस्त अभ्यासिका तीन मजल्यांची असेल. यापैकी दोन मजल्यांचे काम वर्षभरातच पूर्ण झाले आहे. तिसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. प्रवेशद्वारावरच डॉ. आंबेडकर यांचा लक्षवेधक पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. 

महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने या अभ्यासिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, शिक्षण उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी नगररचनाकार विभागातील भूषण पाटील यांची स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तुविशारद कमलेश सुतार, अतुल देशमुख यांनी अभ्यासिकेचा आराखडा तयार केला आहे. शुभम कन्स्ट्रक्‍शनकडून बांधकाम केले जात आहे. २०१५ मध्ये मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख, शहर अध्यक्ष मनोज शेलार यांनी या अत्याधुनिक वातानुकूलित अभ्यासिकेची मागणी केली होती. स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी यांनी अर्थसंकल्पात अभ्यासिकेसाठी तरतूद केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल २०१६ रोजी शाळा क्रमांक ८, ११, २९ च्या आवारात या अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. 

पक्षभेदाला छेद
आम्ही जेव्हा अभ्यासिकेची मागणी केली, तेव्हा शिवसेनेकडे महापौर, स्थायी समितीचे सभापतिपद होते; पण शिवसेनेने पक्षभेद केला नाही. गरजू विद्यार्थी यांची निकड लक्षात घेऊन सहकार्य केले. पक्षभेदाला छेद दिला, अशीची प्रतिक्रिया मनसेचे बंडू देशमुख, मनोज शेलार यांनी व्यक्त केली.

यासम हीच 
अभ्यासिका पूर्णत: वातानुकूलित 
दर्शनी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा.
तळमजल्यावर सुसज्ज ग्रंथालय.
पहिल्या मजल्यावर संगणक प्रशिक्षण केंद्र.
दुसऱ्या मजल्यावर प्रोजेक्‍टर रूम.
तिसऱ्या मजल्यावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सभागृह.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com