विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अनागोंदी

- तेजस वाघमारे
रविवार, 22 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमधील गैरप्रकाराला कोणतीही मात्रा लागू होत नसल्याचे पुन्हा उघड झाले आहे. विद्यापीठामार्फत ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2016 मध्ये घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांत मोठी अनागोंदी झाल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमधील गैरप्रकाराला कोणतीही मात्रा लागू होत नसल्याचे पुन्हा उघड झाले आहे. विद्यापीठामार्फत ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2016 मध्ये घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांत मोठी अनागोंदी झाल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे.

महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांमध्ये कॉपींचा पडलेला खच, केंद्रप्रमुखाची अनुपस्थिती, परीक्षा केंद्राच्या शिक्‍क्‍याविना उत्तरपत्रिका आदी गंभीर बाबी पथकाला आढळल्या. विद्यापीठाला पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक मिळत नसल्याने या विभागाला महाविद्यालयेही गांभीर्याने घेत नाहीत. यातच परीक्षा विभागाच्या हलगर्जीमुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागतो. परीक्षेनंतर निकालही वेळेत लागत नसल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त आहेत.

परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठ भरारी पथके नेमते. त्यात वरिष्ठ प्राध्यापक असतात. विद्यापीठाचे सुमारे 25 परीक्षा झोन असून, प्रत्येक झोनमध्ये एक पथक गैरप्रकार रोखण्यासाठी असते. प्रत्येक पथकात तीन ते चार प्राध्यापक असतात. या पथकाने ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या परीक्षांदरम्यान विविध महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्या वेळी धक्कादायक प्रकार निदर्शनास आले.

परीक्षा केंद्रात कॉपी करण्यासाठी वापरलेले साहित्य सापडले. उत्तरपत्रिकांवर परीक्षा केंद्राचा शिक्का आणि पर्यवेक्षकाची सही नव्हती. ओळखपत्रांवर संबंधित महाविद्यालयाच्या नावाचा शिक्का नसणे, प्राचार्यांची सही नसणे, बैठक क्रमांकाची नोंद नसणे आदी त्रुटी भरारी पथकाला आढळल्या. याची गंभीर दखल घेत पथकांनी याकडे विद्यापीठाचे लक्ष वेधले आहे. प्रभारी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी संलग्न महाविद्यालयांना परिपत्रक काढून हे गैरप्रकार टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे प्रकार यापुढे घडल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी महाविद्यालयांना दिल्या आहेत.