नोट बंदीमुळे भाजीपाला शेतात कुजणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मुंबई - नोटा बंदीचा फटका शेतमालालाही बसला आहे. उठाव नसल्याने निम्मा भाजीपाला विक्रीशिवाय पडून आहे. परिणामी भाज्यांचे भाव 30 ते 40 टक्के कमी झाले. सततच्या दुष्काळानंतर यंदा पावसाने कृपा दाखवली. मात्र, सरकारच्या नोटा रद्दच्या निर्णयामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

मुंबई - नोटा बंदीचा फटका शेतमालालाही बसला आहे. उठाव नसल्याने निम्मा भाजीपाला विक्रीशिवाय पडून आहे. परिणामी भाज्यांचे भाव 30 ते 40 टक्के कमी झाले. सततच्या दुष्काळानंतर यंदा पावसाने कृपा दाखवली. मात्र, सरकारच्या नोटा रद्दच्या निर्णयामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील चौबूत गावातील दत्ता कोल्हे यांनी एक एकरावर दोडका लावला. एकरी 250 किलो दोडका मिळतो. किलोमागे 50 रुपये मिळतील, अशी अपेक्षा होती. हा भाव आता 30 रुपयांपर्यंत आला. स्थानिक बाजारात 20 रुपये किलोने दोडका विकायला लागत आहे. तयार झालेला दोडका मजूर लावून काढला. नोटा बंदीमुळे मालाला उठाव नसल्याने भाव पडला. मजुरांचा खर्चही वसूल होणे अवघड झाले आहे. झाडावर ठेवला तर रोप नासणार, अशा कात्रीत अडकल्याचे कोल्हे यांनी सांगितले. मेथीच्या भाजीची शेतातील जुडी 30 ते 40 रुपये होती. ती आता 10 ते 15 रुपयांवर आल्याचे ते म्हणाले.

दीपक नरवडे यांनी पाच एकरावर आल्याची लागवड केली होते. किलोला 30 रुपये भाव मिळाला, तर किमान खर्च तरी वसूल होतो. नोटा बंदीमुळे मिळेल त्या भावात आले विकावे लागत आहे. नुकसान टाळण्यासाठी त्यांनी पाचशे रुपयांच्या नोटाही स्वीकारण्यास सुरुवात केली. ही परिस्थिती राज्यातील सर्वच गावांतील आहे. पडलेल्या भावात माल विकला तर काढणीसाठी लावलेल्या मंजुरांचाही खर्च वसूल होणार नाही. भाजी काढली नाही तर शेतात कुजणार, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

चौबूत गावचे अर्थकरण
- 20 एकरवर भाजीपाला
- एकरी 70 ते 80 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित
- सध्याच्या परिस्थितीत 30 ते 40 टक्के उत्पन्नात घट
- नोटांचा गोंधळ तीन आठवडे राहिल्यास नुकसान वाढण्याची शक्‍यता