विकी शर्मा हत्याकांड सालेमच्या हस्तकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

डोंबिवली - विकी शर्मा हत्याप्रकरणी पोलिसांनी अबू सालेमचा हस्तक राकेश ऊर्फ राजू अर्जुन हातणकर याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 

डोंबिवली - विकी शर्मा हत्याप्रकरणी पोलिसांनी अबू सालेमचा हस्तक राकेश ऊर्फ राजू अर्जुन हातणकर याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 

कल्याण-शिळ रोडवरील काटई नाका येथे 21 डिसेंबरला बिल्डर समजून विकी शर्मावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हातणकरच्या अटकेनंतर आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. याअगोदर नागेश पांडुरंग सोनावळे आणि अजय ऊर्फ सोनी किशनकुमार वर्मा यांना अटक केली आहे. मानपाडा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कल्याण शाखा पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन काब्दुले आणि पथकाने या हत्याकांडाचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचल्याचे शोधून काढले. हातणकरला मंगळवारी पहाटे ठाण्यातील वैतीवाडी येथून पकडले. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

कोण आहे हातणकर? 
राजू हातणकर हा अबू सालेम याचा खास हस्तक असल्याचे बोलले जात आहे. सात मोठ्या हत्याकांडांत त्याचा हात असल्याचे समजते. मध्यंतरी त्याने अकोला नगर परिषदेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 

नागेश सोनावळे मनोरुग्ण? 
नागेश सोनावळेने गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी त्याच्या आईने पोलिस ठाण्यात आपला मुलगा मनोरुग्ण असल्याचा दाखला दाखवला. त्यामुळे या हत्याकांडातील महत्त्वाचा आरोपी खरंच मनोरुग्ण आहे का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत. 

Web Title: Vicky Sharma massacre