म्हाडाच्या इमारतीत ३२ फुटी वृक्ष!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

१० कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार

विक्रोळी - कन्नमवारनगरमधील म्हाडाच्या ३३ क्रमांकाच्या इमारतीच्या भिंतींमध्ये झाडे उगवली आहेत. अक्षरशः ३२ फुटी पिंपळ वृक्ष बहरला असून तो पार गच्चीपर्यंत गेला आहे. झाडांमुळे संपूर्ण इमारतीला तडे गेले आहेत. इमारत कधीही कोसळू शकते.

३३ क्रमांकाच्या इमारतीत १० कुटुंबे राहत असून, त्यांच्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. म्हाडाने आम्हाला कन्नमवारनगरातील संक्रमण शिबिरात राहण्यास जागा द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

झाडांची मुळे इमारतीत खोलवर गेली आहेत. सुमारे ३२ फूट उंचीचे एक झाड तर भिंतीमधून उगवून थेट टेरेसपर्यंत पोहोचले आहे. तेथील घरांची पडझडही झाली आहे. छत कोसळून अनेकदा छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. सर्पांचा वावर वाढला आहे. पाण्याच्या पाईपलाईनही फुटलेल्या आहेत.
एका खासगी विकसकाने २००५ साली इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. इमारतीच्या गृहनिर्माण संस्थेने तसा करार विकसकाशी केला होता.

त्यानुसार ३२ पैकी २२ कुटुंबे इतरत्र राहायला गेली. करार अनधिकृत आहे, असा आरोप करून १० कुटुंबे तिथेच राहिली. त्यानंतर १२ जानेवारी २०१६ ला गृहनिर्माण क्षेत्र व विकास मंडळाने माहिती अधिकारात एक स्पष्टीकरण दिले. आमच्या कार्यालयात ३३ क्रमांकाच्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आलेला नाही, असे मंडळाने स्पष्ट केले. त्यामुळे इमारतीच्या पुनर्विकासाभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. सध्या राहत असलेली १० कुटुंबे म्हाडाचे भाडे नियमित भरत आहेत. त्यामुळे संक्रमण शिबिरात आमचे पुनर्वसन होणे आवश्‍यक आहे, अशी  त्यांची मागणी आहे.
 
पंखाही लावणे धोक्‍याचे
इमारत इतकी धोकादायक आहे की छत खराब असल्याने आम्ही पंखाही लावू शकत नाही. १० वर्षांपासून अशा स्थितीत राहत आहोत. म्हाडाने आमच्याकडे दयेच्या दृष्टिकोनातून पाहावे, अशी मागणी रहिवासी लुझिया फर्नांडिस आणि अमित प्रभू यांनी केली आहे. 
 
पुनर्विकासाचे चुकीचे धोरण राबविण्यात आले आहे. त्याचे परिणाम रहिवाशांना भोगावे लागत आहे.
- सुरेश सरनोबत (सामाजिक कार्यकर्ते)