'राजा'ला अवघे 'सात' दिले!

#VoteTrendLive MNS defeated in Nashik
#VoteTrendLive MNS defeated in Nashik

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरासहित महाराष्ट्रामधील पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती अशा महत्त्वपूर्ण शहरांमधील महानगरपालिकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहे. मुंबईमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षापेक्षा (भाजप) अवघ्या दोन जागा जिंकण्यात यश मिळविले; तर इतरत्र बहुतेक ठिकाणी भाजपने आपला स्वप्नवत "फॉर्म' कायम राखण्यात यश मिळविले. भाजप व सेनेच्या या घोडदौडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व काही प्रमाणात कॉंग्रेस या दोन मुख्य पक्षांनी कसेबसे उभे राहण्यात यश मिळविले. परंतु अवघ्या पाच-सहा वर्षांपूर्वी राज्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय पक्ष मानला जात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था मात्र या निवडणुकीत सोसाट्याच्या वादळामध्ये उडून जाणाऱ्या असहाय्य पालापाचोळ्याप्रमाणे झाली आहे. 1992 पासून महापालिकेच्या सहा निवडणुकांमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा वा अन्य गुणांचा; तसेच रतन टाटांसारख्या प्रतिष्ठित उद्योगपतीची शाबासकीच्या "थापां'चाही त्यांच्या पक्षाची ही दयनीय अवस्था रोखण्याकरिता काहीही उपयोग झाला नाही. नाशिकसारख्या शहरात एकहाती सत्ता मिळविणाऱ्या व पुण्यामध्ये दुसऱ्या प्रयत्नांत तब्बल 29 नगरसेवक निवडून आणणाऱ्या मनसेची अशा अवस्था झालीच कशी? 

मुंबईमध्ये तर मतदारांनी मनसेची फारच क्रूर चेष्टा केली आहे. मनसेचे प्रमुख नेते (सेनापती!) बाळा नांदगावकर हे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेशी तहयाचना करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र शिवसेनेने हा प्रस्ताव थंडपणे झिडाकारुन लावल्यानंतर, उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्यानंतर या पक्षास आपल्या एकाकीपणाची जाणीव अधिक प्रखरतेने झाली असावी. यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी "राजाला साथ द्या' या गाण्याची एंट्री झाली! मात्र मतदारांनी बहुतेक हे गाणे नीट ऐकले नसावे... कारण एकट्या पडलेल्या राजाला भक्कम "साथ' देण्याऐवजी मुंबईने अवघे "सात' उमेदवार देऊ केले आहेत. बिचाऱ्या राजाची अशी गलितगात्र अवस्था होण्यामागील कारणीमीमांसा गेला काही काळ विविध माध्यमांमधून सातत्याने करण्यात आली आहे. परंतु, यानंतरही हे कोडे समाधानकारकरित्या उलगडलेले नाही. मनसेचा एकंदर आव हा "पतिव्रतेला धोंडा' अशा स्वरुपाचा असला; तरी मतदारांना मात्र अशा स्वरुपाचे काहीही न वाटल्याचे निष्पन्न झाले आहे. तेव्हा मनसेसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण मुद्यांचा विचार करणे अर्थातच भाग आहे. 

राज्यातील इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेमध्ये राज यांना लाभलेल्या दमदार वक्तृत्वाची व राजस व्यक्तिमत्त्वाची कायमच विशेषत्वे दखल घेतली गेली आहे. किंबहुना, मनसेच्या स्थापनेवेळीही राज यांना मिळालेल्या सहानुभूतीचा आधार प्रामुख्याने या दोन गुणांवरच होता. बाळासाहेब यांचा राजकीय वारसदार होण्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व गुण राज यांच्याकडे असूनही त्यांना केवळ "पुत्रप्रेमा'पायी त्यापासून वंचित रहावे लागले, अशीच प्रातिनिधिक जनभावना यावेळी होती. परंतु, गेल्या सहा-सात वर्षांत राज व पक्षाचीच एकंदर प्रतिमा झपाट्याने घसरली आणि हळुहळू अक्षरश: रसातळाला गेली. मुंबई, नाशिकसहित इतर शहरांमधील पक्षाचे सुभेदार, सरदार दरकदार हळुहळू काढता पाय घेऊ लागले. अखेर उत्तर भारतीयांना मारहाण केल्याने राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांचे लक्ष स्वत:कडे वळविण्यात यशस्वी झालेल्या मनसेला मुंबईत चक्क उत्तर भारतीयांनाच उमेदवारी द्यावी लागली. परंतु, यानंतरही पक्षाच्या कामगिरीमध्ये सुधारणा होण्याची शक्‍यता शून्यच होती. 

राज यांनी लढविलेली ही महानगरपालिकांची निवडणूक काही कारणांचा विचार करता निश्‍चितच वैशिष्ट्यपूर्ण होती. कोणत्याही महानगरपालिकेमध्ये केलेल्या कामांचे मोठ्या स्तरावर "लाईव्ह प्रेझेंटेशन' करणारे राज हे पहिलेच नेते असावेत. आजुबाजुला विविध पक्षांचा टीकेचा भडिमार सुरु असताना; आणि प्रामुख्याने कोथळा, खंजीर, अफजल खान, मावळे, गद्दारी अशा स्वरुपाचा भाषाविलास सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता केवळ "डेव्हलपमेंट'चा मुद्दा प्रचारात मध्यवर्ती बनविलेले राज हे खरेच एकटे होते. अर्थात, यामध्ये राज यांची राजकीय अपरिहार्यता किती, हा महत्त्वपूर्ण विषय आहे! कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेसहित इतर राजकीय पक्षांनी राज वा मनसेकडून केल्या जाणाऱ्या टीकेची बहुतांशी दखलही घेतली नाही. तेव्हा राज यांना अत्यंत प्रिय असलेल्या "राजकीय वादावादी'च्या खेळपट्टीवर त्यांना खेळताच आले नाही. टाटांच्या आर्थिक पाठबळावर उभे राहिलेले नाशिकमधील "बोटॅनिकल गार्डन', चांगले रस्ते, आश्‍वस्त पाणीपुरवठा, बाळासाहेबांचे स्मारक अशा विविध कामांची दखल घेत राज यांनी मतदारांना मते देण्याचे आवाहन केले. हे आवाहन कधी "आम्हाला निवडून द्या; नाहीतर पुन्हा तक्रार करु नका,' अशा सुरांत होते; तर कधी कधी विकासाच्या मुद्यावरुन होते. फार काय, "उठा उठा आभाळ फाटलयं, झालाय राख देश सारा, समुद्रांच्या पोटातलं पाणीही आटलयं,' असे भीषण प्रलयाचे चित्र उभे करुन तरी मतदार राजाला साथ देतील, अशा भाबड्या आशेत कृष्णकुंजचा दरबार होता. अर्थातच, हे स्वप्न फारच निष्ठुरतेने भंगले आहे. 

मनसेच्या निवडणुकीमधील कामगिरीविषयी आडाखा बांधणे खरे तर अत्यंत अवघड आहे. सामान्यत: एखाद्या नेत्याच्या भाषणास होणारी गर्दी हे मतदारांना त्याच्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे व म्हणूनच "पोटेंशिअल मतां'चे लक्षण मानले जाते. परंतु, राज यांच्या सभांना होणारी गर्दी व त्यांच्या पक्षास मिळणारी मते यांचे व्यस्त प्रमाण पाहता, हे सामान्य समीकरण अगदीच कोलमडून जाते. राज यांची सभा लोक ऐकण्यासाठी जातात वा पाहण्यासाठी जातात, हाच खरा प्रश्‍न आहे! राज यांच्याकडून केले जाणारे नकलांचे कार्यक्रम पाहून कदाचित लोकांचे मनोरंजन होत असेल. अर्थातच, यामधून एक गोष्ट स्पष्ट होते. लोकांना राज अजूनही प्रिय आहेत. त्यांची शैली, बेधडकपणा, क्वचितप्रसंगी दिसणारा अभ्यास अशा विविध गुणांचे नागरिकांना आकर्षण आहे. मात्र मत देताना ते नागरिक राज यांना विश्‍वासार्ह मानत नाहीत, हेदेखील तितकेच स्पष्ट आहे! राज यांची राजकीय विश्‍वासार्हता संपली आहे काय, हाच प्रश्‍न या (याही!) निवडणुकांच्या निमित्ताने विचारता येईल. मनसेच्या या निराशाजनक कामगिरीची कारणीमीमांसा कितीतरी वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून करता येईल. मात्र सध्या तरी हरवलेली विश्‍वासार्हता आणि संघटनात्मक शून्यता अशा काटेरी चक्रात अडकलेला हा पक्ष हतवीर्य झाला आहे, यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com