मतदान केंद्रात आयत्यावेळी बदल

- गोविंद तुपे
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मुंबई - प्रचार एकीकडे आणि मतदान दुसरीकडे, अशी अवस्था मुंबईतील उमेदवारांची झाली आहे. मुंबईच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांतील क्रमवारीत तीन दिवसांपूर्वी झालेल्या बदलामुळे अनेक प्रभागांतील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. या बदलामुळे उद्या (ता.21) मतदानाच्या दिवशी गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - प्रचार एकीकडे आणि मतदान दुसरीकडे, अशी अवस्था मुंबईतील उमेदवारांची झाली आहे. मुंबईच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांतील क्रमवारीत तीन दिवसांपूर्वी झालेल्या बदलामुळे अनेक प्रभागांतील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. या बदलामुळे उद्या (ता.21) मतदानाच्या दिवशी गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे.

काही प्रभागातील मतदारांची नावे अन्य प्रभागांतील यादीत गेल्याने मतदान कोणाला करायचे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. प्रभागात नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांची मते कशी पदरात पाडायची, असा प्रश्‍न उमेदवारांसमोर उभा राहिला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेने प्रारूप मतदार यादी जानेवारीत प्रसिद्ध केली होती. यानुसारच नव्या प्रभागाच्या सीमा निश्‍चित करून प्रभागात नोंदणी झालेल्या मतदारांची यादी सर्व राजकीय पक्षांना उमेदवारी अर्ज भरताना देण्यात आली होती. मात्र तीन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पुन्हा सर्वच प्रभागांमधील मतदार यादीचा क्रम बदलल्याने दरवर्षी येणारे मतदान केंद्र आणि प्रभाग यात बदल झाले आहेत. या बदलामुळे उमेदवारही बदलले आहेत.

विशेष म्हणजे निवडणूक अधिकारी आणि मतदान प्रतिनिधी यांच्याकडील मतदार यादीतील क्रमात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. मतदार यादीतील अनेक मतदारांचे अनुक्रमांक बदलले गेल्याने केंद्रांवरील व्यवस्थेतही बदल झाला आहे. त्याचा फटका मतदारांसह उमेदवारांनाही बसण्याची शक्‍यता भाजपचे कुलाबा मतदारसंघाचे महामंत्री दीपक राव यांनी व्यक्त केली. या बदलाबाबत महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एका सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने ही चूक झाली असल्याचे मान्य केले. तसेच ही चूक लक्षात आल्यानंतर आम्ही ती दुरुस्तही केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'नवजीवन'चा बहिष्कार मागे
मुंबई सेंट्रलच्या "नवजीवन सोसायटी'तील तीन मतदान केंद्रांत झालेल्या बदलामुळे तेथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सी आणि डी वॉर्डाचे निवडणूक अधिकारी सत्यनारायण बजाज यांनी मतदान केंद्रे पूर्वीप्रमाणेच पुन्हा नवजीवन सोसायटी लगत उभारली आहेत. त्यामुळे मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे "नवजीवन सोसायटी'चे सचिव राजू मर्चंट यांनी सांगितले.

Web Title: voting center changes