सात महिन्यांनंतर फुटणार वर्सोवा पुलाची कोंडी

श्रीकांत सावंत
बुधवार, 17 मे 2017

ठाणे - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई खाडीवरील वर्सोवा पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून अजून चार ते पाच दिवसांत पूल वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पूल सुरू झाल्यानंतर तब्बल सात महिन्यांनंतर कोंडी फुटणार आहे.

ठाणे - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई खाडीवरील वर्सोवा पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून अजून चार ते पाच दिवसांत पूल वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पूल सुरू झाल्यानंतर तब्बल सात महिन्यांनंतर कोंडी फुटणार आहे.

पुलाचे ‘लोड टेस्टिंग’चे काम सुरू असून त्यासाठी पुलाच्या भेग गेलेल्या भागावर सुमारे दीडशे टन वजनाचे ट्रक उभे करून ठेवण्यात आले आहेत. पुलाच्या चीर असलेल्या भागात प्रत्येक क्षणाचे निरीक्षण नोंदवले जात असून त्याची क्षमता तपासण्यात येत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर दुरुस्ती पूर्ण होणार असून सात महिन्यांनंतर वर्सोवाची कोंडी फुटणार आहे. सध्या पूल वाहतुकीसाठी बंद असला, तरी याविषयी मोठ्या प्रमाणातील जनजागृतीमुळे या भागात अवजड वाहने कमी संख्येने येत असून वाहतूक कोंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे; मात्र एकदिशा मार्ग सुरू असल्याने एक ते दोन तासांचा खोळंबा मात्र सुरूच आहे.  

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने व गुजरातकडून मुंबईकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असून या मार्गावरील वर्सोवा पूल धोकादायक स्थितीत पोहोचला होता. पुलाच्या गर्डरला चिरा गेल्या असतानाही त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू होती. याविरोधात व्यापक आवाज उठवल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि आयआरबीने घेतला. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अधिसूचना काढून हा जुना पूल अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला होता. केवळ कमी वजनाच्या वाहनांची वाहतूक त्यावरून सुरू होती. पुलाच्या दुरुस्तीत वारंवार अडथळे येत असल्याने या भागातील कोंडी सातत्याने वाढत होती. ‘सकाळ’च्या माध्यमातून याबाबतच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध झाल्यानंतर या कामाला वेग आला होता. एप्रिल ते मे दरम्यान या भागाचे महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. 

लोखंडी अँगलचा टेकू
गर्डरच्या दोन्ही बाजूंना लोखंडी अँगल लावून पुलाला मजबुती देण्यात आली आहे. संपूर्ण लोखंडी आधार देऊन पूल सुरक्षित करण्यात आला आहे. पुलाची क्षमता तपासण्यासाठी सोमवारपासून तो बंद ठेवण्यात आला होता. या काळात नव्या पुलावरून सगळी वाहतूक सुरू आहे. 

अशी सुरू आहे क्षमता तपासणी  
जुन्या वर्सोवा पुलावर गर्डरला पडलेली भेग बुजवण्यात आली आहे. त्या भागात २५ टन वजनाने भरलेले सहा अवजड ट्रक २४ तास उभे करून ठेवण्यात आले आहेत. पुलाच्या खालच्या बाजूला निरीक्षकांचे पथक तैनात असून ते क्षणाक्षणाला पुलाविषयीचे निरीक्षण नोंदवत आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतरच याविषयी अधिकृतपणे सांगण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

दोन तासांचा खोळंबा नित्याचा  
जुना पूल बंद केल्यामुळे नव्या पुलावर ताण निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत होती; मात्र पालघर आणि ठाण्यातून होणारी बरीचशी अवजड वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवल्याने सोमवारी वाहतूक कोंडीचा ताण कमी जाणवला. शनिवारी आणि रविवारी या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पालघरच्या दिशेला दहा किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तासांचा खोळंबा आता नित्याचा झाला आहे, असे समजून अनेक वाहनचालक मार्गस्थ झाल्याचे येथील पोलिस सूत्रांनी सांगितले.

Web Title: warso bridge traffic slove