कोट्यवधी खर्चूनही पाणी प्रकल्प रेंगाळले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

'24 तास पाणी' कागदावरच; भाजपने केले शिवसेनेला लक्ष्य
मुंबई - तीन वर्षांत तीन कोटी 30 लाखांचा खर्च करूनही पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. 24 तास पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. पाणीपुरवठा प्रकल्पावरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने गुरुवारी शिवसेनेला लक्ष्य केले.

'24 तास पाणी' कागदावरच; भाजपने केले शिवसेनेला लक्ष्य
मुंबई - तीन वर्षांत तीन कोटी 30 लाखांचा खर्च करूनही पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. 24 तास पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. पाणीपुरवठा प्रकल्पावरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने गुरुवारी शिवसेनेला लक्ष्य केले.

वांद्रे आणि मुलुंड येथे 24 तास पाणीपुरवठा करण्याची योजना पालिकेने तयार केली; मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांत तीन कोटी 30 लाखांचा खर्च केल्यावरही या योजनेला गती आलेली नाही. काम कासवगतीने सुरू आहे. प्रशासन कंत्राटदाराला जावयाप्रमाणे वागणूक देते, असा आरोप भाजपने स्थायी समितीत केला. अशी धीम्या गतीने कामे सुरू राहिल्यास 24 तास पाणीपुरवठ्याची योजना यशस्वी कधी होणार, असा सवाल करत भाजपने प्रशासन आणि शिवसेनेला लक्ष्य केले.

24 तास पाणीपुरवठ्याची योजना वांद्रे आणि मुलुंड भागात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. याचे कंत्राट सुएज या कंपनीला दिलेले आहे. आतापर्यंत या कामांसाठी 30 कोटींचा खर्च करण्यात आला; मात्र ती यशस्वी झालेली नाही. या प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. दोन विभागांतील कामाला इतकी दिरंगाई होत असेल, तर उर्वरित 23 विभागांत हे काम कधी पूर्ण होणार? असेच काम होणार का, याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. प्रेशर वॉल न लावल्याने कामाला उशीर झाला, असे स्पष्टीकरण जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांनी दिले. पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी गारगाई -पिंजाळ प्रकल्पातून सहा हजार एमएलडी पाणी मिळणार आहे.

सुएज कंपनीच्या कंत्राटदाराला प्रशासन जावयाप्रमाणे वागवते. आम्ही या ठिकाणी भेट दिली; पण कंत्राटदार आम्हाला जुमानत नाही. "24 तास पाणीपुरवठा' ही घोषणा केवळ कागदावर राहिली असून खर्च झालेले 30 कोटी वाया जाण्याची शक्‍यता आहे, असे समाजवादी पक्षाचे रईस शेख म्हणाले. वांद्रे येथे दूषित पाणीपुरवठा होतो. रहिवासी हैराण झाले आहेत; मात्र प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी केला. पाण्याच्या प्रश्‍नावर प्रशासनाने लेखी खुलासा करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला दिले.

सांडपाण्यावरील प्रक्रिया
मुंबईत सात ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उदंचन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्या पाण्याचा पुनर्वापर केला जाईल. कुलाबा येथे काम सुरू झाले आहे. येथून 28 एमएलडी पाणी मिळेल. उर्वरित घाटकोपर, वर्सोवा, वांद्रे, वरळी व अन्य दोन ठिकाणी हे प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली. यापूर्वी धारावी, दादर व खार येथे उदंचन केंद्रे सुरू करण्यात आली होती, ती बंद का झाली, असा प्रश्‍न मनोज कोटक यांनी विचारला. काही अडचणी आल्याने हे प्रकल्प 15 वर्षांपूर्वी बंद करण्यात आले. त्याबाबतचे कारण प्रशासन शोधत आहे, असे उत्तर दराडे यांनी दिले.

Web Title: water project uncompleted