रुग्णवाहिकांना मार्ग दिलाच पाहिजे - अमिताभ

ज्ञानेश चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

अमेरिकेतील अनुभव 
अमेरिकेत वाहतूक परवाना मिळवण्यासाठी मला तीन महिने लेखी परीक्षा द्यावी लागली. त्यासाठी कोचिंग क्‍लासलाही जावे लागले. मला रस्त्यावर वाहन चालवता येते की नाही हे पाहण्यासाठी सात चाचण्या झाल्या. त्यानंतरच परवाना मिळाला. आपल्याकडे असे काहीच होत नाही, अशी खंत अमिताभ बच्चन यांनी "सकाळ‘जवळ व्यक्त केली.

मुंबई - रुग्णवाहिकेचा आवाज ऐकू आला, की तिला पुढे जायला आधी जागा द्यायला हवी, हा खूपच साधा नियम आहे. अनेकदा गणेश विसर्जनाच्या वेळी होणाऱ्या गर्दीतून रुग्णवाहिकांना पुढे जाण्यास सुज्ञ नागरिक व माणूस म्हणून वाहनचालकांनी मदत केली पाहिजे, असे आवाहन महानायक अमिताभ बच्चन यांनी "सकाळ‘ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत केले. 

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकांच्या वेळी भाविकांच्या उसळणाऱ्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. रुग्णवाहिका त्यात अडकतात. त्यामुळे रुग्णाचा रस्त्यातच मृत्यू होण्याची भीती असते. हे ओळखून "सकाळ‘ माध्यम समूह "वे टू ऍम्ब्युलन्स‘ ही संकल्पना यंदाच्या गणेशोत्सव काळात राबवत आहे. "सकाळ‘, "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क‘ (यिन) व "तनिष्का‘चे प्रतिनिधी रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून देणार आहेत. याबाबत बच्चन यांना विचारले असता, त्यांनी वाहतूक पोलिसांसोबत जनजागृती करण्याची तयारी दर्शवली. 

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे यासाठी जनजागृती करण्यास मी वाहतूक पोलिसांसोबत कधीही तयार आहे. मी वाहतूक पोलिसांसमोर हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून ठेवत आहे. मात्र, अद्याप त्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. प्रवास करताना मी रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळण्यासंबंधी वाहनचालकांना वारंवार सांगत असतो. मी दुहेरी रेषेच्या अलीकडे माझी गाडी उभी करतो. अनेक चालक गाड्या या रेषेच्या पुढे उभ्या करतात. असाच प्रकार सिग्नलवर होतो. वाहनचालक सिग्नलकडे दुर्लक्ष करून पुढे जातात. पुढच्या सिग्नलवर ते सापडले की सिग्नल का तोडला याचा मी त्यांना जाब विचारतो. नियमांचे पालन करण्याविषयी प्रसंगी मी त्यांना दरडावतो, असे ते म्हणाले. 

रस्त्याच्या कोपऱ्यांवर वाहनचालक अगदी टोकाला गाड्या उभ्या करतात. कोपऱ्यांपासून 15 फूट अलीकडेच गाड्या उभ्या करायच्या असतात. कारण- त्यामुळे वाहन वळवणे सोपे जाते. या कोंडीचा त्रास अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनांनाही होतो, असे बच्चन म्हणाले.