ऑस्ट्रेलियातील मराठी महिलांनी साजरी केली मंगळागौर..!

सुचिता करमरकर
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

प्रत्यक्ष या कार्यक्रमात 150 महिलांनी सहभागी होत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. पारंपारिक परकर पोलकं घालून आलेल्या मुली तर नऊवारी साडीत नथ घालून सजलेल्या महिलांनी वातावरणात मराठीपण आणले

कल्याण - नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात गेलेली मराठी कुटूंब आजही आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियातील मराठी कुटूंबातील महिलांनी एकत्र येत प्रथमच मंगळागौर साजरी केली. 

लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्ष मंगळगौरीचे पूजन केले जाते. लग्नानंतर परदेशी स्थायित्व होणाऱ्यांचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढले आहे. मात्र या परंपरा साजरा करण्याचा उत्साह मात्र आजही कायम आहे. हाच धागा पकडून अमृता आपटे यांनी सामूहिक मंगळागौर साजरी करण्याचे ठरवले. मुळच्या पुण्याच्या असलेल्या अमृता काहीच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात आल्या आहेत. मराठी मम्स् ऑस्ट्रेलिया हा 1500 महिला असलेले एक फेसबुक पेज चालवणाऱ्याआरती चिटणीस, तसेच कार्यक्रम आयोजनाचा अनुभव असणाऱ्या देवश्री दातार यांनी सिडनी येथे बारा ऑगस्टला हा मंगळागौरीचा कार्यक्रम केला. येणाऱ्या सवाष्णींचे पारंपारिक रितीने हळदी कुंकू लावून तसेच गजरा देऊन स्वागत करण्यात आले. मंगळाौरीच्या व्रताची माहिती देत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ऑस्ट्रेलियात स्थायिक कुटूंबातील दुसऱ्या पिढीला या व्रताची तसेच त्यावर तीन पिढ्यांची मते मांडणारी गाणी सादर करण्यात आले. सध्या सर्वत्र धुमाकळ घालत असलेल्या सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? या चालीवर ही गाणी सादर झाली. 

या कार्यक्रमात मॅजिकल मंगळागौरी क्वीन्स ही मंगळागौरीच्या खेळांची स्पर्धा आयोजित केली गेली. अवघ्या एका आठवड्यात या स्पर्धेस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कत्थक नृत्य पारंगत असलेल्या हर्षदा तोताडे आणि सुषमा कर्वे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. कर्वे यांनी या व्रताची सांगितलेली कथाही उपस्थितांना भावली. मंगळागौरीची माहिती विचारणारी फेसबुक वर झालेल्या स्पर्धेतही अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. प्रत्यक्ष या कार्यक्रमात 150 महिलांनी सहभागी होत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. पारंपारिक परकर पोलकं घालून आलेल्या मुली तर नऊवारी साडीत नथ घालून सजलेल्या महिलांनी वातावरणात मराठीपण आणले. 

Web Title: women in australia celebrate traditional manglagaur