महिलांनी कसली महिलांसाठी कंबर 

महिलांनी कसली महिलांसाठी कंबर 

उल्हासनगर - निवडणुका म्हटल्या की, उमेदवारांच्या मागे-पुढे कार्यकर्त्यांची गर्दी ही आलीच; पण आता महिलांना निवडणुकीत ५० टक्के आरक्षण लागू झाल्यामुळे विविध पक्षांच्या दादा, भाऊंप्रमाणे ताईंनासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अवतीभोवती जास्तीत जास्त महिला कार्यकर्त्यांची वर्दळ दाखवून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी महिला उमेदवारांनीही कंबर कसली आहे. जास्तीत जास्त महिला कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी यावे, यासाठी विविध प्रलोभने दाखवली जात आहेत. 

सध्या जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे घरच्या होम मिनिस्टरचे बजेट पार कोलमडले आहे. त्यात निवडणुका असल्यामुळे रोज प्रचार करून त्याचा मोबदला मिळत असल्याने महिलांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या रणसंग्रामात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू आहेच; पण याव्यतिरिक्त अन्य काही प्रभागातूनही महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेसह उल्हासनगरमध्येही शहरातील महिला मतदार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या अनुषंगाने महिला मतदारांमध्ये पोहोचता यावे याकरिता सर्वच राजकीय पक्षांच्या महिला उमेदवारांनी जास्तीत जास्त महिला कार्यकर्त्यांची जमवाजमव केली आहे. आजकाल पक्षासाठी एकनिष्ठपणे कार्य करणारे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. त्यामुळे प्रचारासाठी कार्यकर्ते खरेदी करण्याचा एक नवा ट्रेण्ड निर्माण झाला आहे.

महिला बचत गटांचा आधार 
गळ्यात पक्षाचा मफलर, हातात झेंडा घेऊन रॅली, चौकसभांच्या ठिकाणी प्रचारासाठी महिला गर्दी करताना दिसतात. कार्यकर्ते जमवण्यासाठी महिला बचत गटांची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जाते. राजकीय पक्षाच्या महिला उमेदवार या बचत गटाशी संलग्न असतात. बचत गटातील बहुतांश महिला या गरीब कुटुंबातील असल्यामुळे महिला उमेदवारांना सहजपणे कार्यकर्ते मिळतात. बचत गटांना विविध माध्यमातून मदत करण्याचे काम राजकीय पक्ष करत असतात. या महिलांना दररोज प्रचारासाठी साधारण ३०० ते ५०० रुपये मोबदला; तसेच दोन वेळचे जेवण, चहा, नाश्‍ता दिला जात आहे. त्यामुळे निवडणुकांच्या काळात महिला कार्यकर्त्यांना "अच्छे दिन' आले आहेत, एवढे नक्की.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com