महिलांच्या डब्यात हुल्लडबाजी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

ठाणे - लोकलमधला रात्रीचा प्रवास दिवसेंदिवस धोक्‍याचा होत आहे. बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास खोपोली लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना फेरीवाल्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला. लोकलमध्ये महिलांची तुरळक गर्दी असून एकही पोलिस नव्हता. त्यामुळे चार फेरीवाल्यांनी कुर्ल्यापासून ठाण्यापर्यंत बिनदिक्कत त्या डब्यातून प्रवास केला. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान या मंडळींनी आपापसात शिवीगाळ सुरू केल्याने प्रवासी महिलांना मात्र भीतीने धडकी भरली होती. 

खोपोली लोकलमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता आरगडे यांनी या प्रसंगाचे वर्णन करताना महिला जीव मुठीत घेऊन प्रवास करत होत्या असे केले. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान दोन ते तीन वेळा गाडी फलाटाव्यतिरिक्त थांबल्यामुळे महिलांमध्ये भीती पसरली होती. लोकलमधून रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्याची सूचना असून अनेक वेळा महिला डब्यांमध्ये रेल्वे पोलिस नसल्याची तक्रार महिलावर्गाकडून सातत्याने होत आहे. सायंकाळच्या सुमारास प्रत्येक डब्यामध्ये पोलिस कर्मचारी दिसत असला तरी रात्री उशिरा ते जागेवर नसल्याचे दिसून येत आहे. पोलसि कर्मचारी नसल्यावर फेरीवाले महिलांच्या डब्यामध्ये घुसून बिनदिक्कत प्रवास करतात. बुधवारी रात्री डोंबिवली येथे राहणाऱ्या लता अरगडे यांनी दादर येथून खोपोलीला जाणारी जलद गाडी पकडली. या गाडीमध्ये दादर स्थानकामध्ये एक फेरीवाला चढला. त्यानंतर कुर्ल्यात आणखी तीन आले. त्यांची दंगामस्ती सुरू होती. यामुळे महिला प्रवाशी तणावाखाली होत्या. फेरीवाल्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना बोलण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. 

पोलिसांचा कामचुकारपणा 
महिला डब्यामध्ये सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिस कर्मचारी अनेक वेळा महिलांच्या डब्यात पोहोचतच नाही. त्यामुळे महिलांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. चार दिवसांपूर्वी एका लोकलमध्ये संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाने रिकाम्या आसनावर आडवे होऊन झोप घेतली.