पाकिस्तानच्या झारा ब्रॅंडच्या दुकानाची मनसेकडून तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई  - पाकिस्तानात तयार केलेले कपडे विकण्यास आक्षेप घेत लोअर परळमधील "पॅलेडियम मॉल'मधील झारा या आंतरराष्ट्रीय दुकानाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. हे कार्यकर्ते मंगळवारी दुपारी दुकानात घुसले आणि त्यांनी तेथील पाकिस्तानी उत्पादनांची नासधूस केली. पाकिस्तानी बनावटीचे कपडे पायदळी तुडवण्यात आले. पाकिस्तानात तयार झालेल्या वस्तू मुंबईतील कुठल्याही मॉल किंवा दुकानात विकले जात असल्याचे आढळले तर मनसे त्यांना धडा शिकवेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

आठवडाभरापासून मनसे पाकिस्तानविरोधात आंदोलन करीत आहे. आधी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाविषयीचा संताप, नंतर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी मुंबईत दुचाकी फेरी आणि आता थेट शॉपिंग मॉलमध्ये घुसून पाकिस्तानी उत्पादनांची नासधूस करण्यात आली. पाकिस्तानात तयार झालेल्या वस्तू विकू नका; अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनसेने मुंबईतील सर्व मॉल आणि डिपार्टमेंटल स्टोअरच्या व्यवस्थापनांना दिला आहे.