जागतिक महिला दिन : फुलशेतीतून फुलवला सुरेखाबाईंनी संसार

महिला बचत गटातून नियोजन; नऊ महिलांनाही मिळाला रोजगार
International Women Day
International Women Day sakal

नांदेड : गोदावरी नदीचा वेढा ज्या गावापासून थोड्या अंतराने पुढे सरकत जातो. त्यापैकी नाळेश्वर हे एक गाव. तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गोदावरीने जे सुपीक काठ दिले आहेत. ते काठ नाळेश्वरच्या वाट्याला आले. नैसर्गिक सुबत्ता असूनही अल्पभुधारक शेतकऱ्यांना फारसे काही हाती लागेलच याची मात्र श्वाश्वती नाही. वरचेवर पिढ्याप्रमाणे होत आलेल्या शेतीच्या वाटण्यामुळे शेतीचे अधिक छोटे - छोटे तुकडे पडत गेले. या छोट्या तुकड्यात शेती करायची कशी? हा प्रश्न असंख्य शेतकऱ्याप्रमाणे नाळेश्वर येथील सुरेखा मैठे यांनाही पडला होता. परंतु, त्यांनी न डगमगता कोरडवाहू शेती फुलवून बचत गटाच्या माध्यमातून स्वतःसह नऊ महिलांचाही संसार फुलवला आहे.

हौसेने मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी सुरु असलेली धडपड, त्यांना लागणाऱ्या ट्युशन फिसच्या मोठ्या रकमा, नांदेड जवळ असल्याने जे काही अधिक चांगले असेल ते मुलांना मिळावं, असे स्वप्न सुरेखा संभाजी मैठे बघत होत्या. परंतु, अडीच तीन एकरात नेमके भागवायचे कसे? याचे उत्तर त्यांना सापडत नव्हते. मात्र, सुरेखाबाईंनी आपल्या अडीच एकर शेतीवर स्वप्न पाहणे थांबवले नाही. एक दिवस महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) महिला बचत गटांच्या माध्यमातून या गावात काही करता येईल का?, याच्या चाचपणीसाठी नाळेश्वरला माविमचे समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड गेले होते. अधिक श्वाश्वत उत्पनाच्या प्रयत्नात असलेल्या सुरेखाबाईंनी त्यांची भेट घेतली. बचत गटाच्या माध्यमातून खूप काही होवू शकते, हा विश्वास राठोड यांनी सुरेखाबाईंना दिला.

यातूनच पुढे आदिशक्ती महिला बचतगट साकारला. माविमने या गटाला किराणा दुकानासाठी एक लाख ७५ हजार रक्कम बँकेमार्फत मिळवून दिली. या व्यवसायातून सुरेखा मैठेसह इतर नऊ जणी खऱ्या अर्थाने आदिशक्ती झाल्या. घेतलेल्या कर्जाची रक्कम सुरेखाबाईंनी आपल्या कौशल्यातून एका वर्षातच फेडून टाकली. जोडीला पिठाची गिरणी सुरु केली. गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेडही त्यांनी नियमितपणे पूर्ण केली.

संसारासाठी शेतीवरचा आर्थिक ताण सुरेखाबाईंनी इतर व्यवसायातून दूर केल्याने त्यांचे पती संभाजी मैठे यांनी आपल्या ९० गुंठ्यावर निशिगंधासह गुलाब शेतीचे स्वप्न पाहिले. ‘फुलांची शेती करायला सोपी नाही. खूप जीव लावावा लागतो झाडांवर मग तेव्हा निशिगंध आणि गुलाब फुलतात’ या शब्दात सुरेखाबाईंनी शेतीतले अनुभव सांगितले. फुल शेतीत गुलाब, निशिगंध, गलांडा, बिजली फुल लावून उत्पादनाचे गणित बसवले.

जीवनातही गुलाब फुलविला

रोज गुलाब काढता-काढता खूप सारे काटे हाताच्या वाट्याला घ्यावे लागतात. हिवाळ्यात पहाटे उठून फुलांची तोडणी करणे तेवढे सोपं नाही. आमचे सर्व घर या कामात असल्याने एक प्रकारे आम्हाला आमच्या जीवनातही गुलाब फुलविता आले, अशी प्रांजळ कबुली सुरेखा संभाजी मैठे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com