raees
raees

मनोरंजनाचा रईस मसाला (नवा चित्रपट -रईस)

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या "फॅन्स' आणि "डिअर जिंदगी' या चित्रपटानंतर शाहरूखच्या "रईस'कडे सगळ्यांचेच डोळे लागलेले होते. शाहरूखने या चित्रपटाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर केली होती. साहजिकच चित्रपटाबद्दल सगळ्यांना मोठी उत्सुकता लागली होती. कारण शाहरूख हा चांगला मसाला एन्टरटेनर आहे आणि तो आपल्या चित्रपटात एन्टरटेनिंगचे नवनवीन फंडे वापरत असतो. "रईस'च्या बाबतीत असेच काहीसे म्हणावे लागेल. "रईस' हा एक मसालापट आहे आणि शाहरूखने हा चित्रपट अधिकाधिक करमणूकप्रधान कसा होईल याकडे लक्ष दिले आहे. त्याला संगीताची आणि काही संवादांची साथ उत्तम लाभली आहे. "रईस' हा एक गरीब कुटुंबात जन्मलेला असतो. लहानपणापासूनच "कोई भी धंदा छोटा नही होता और धंदेसे बडा कोई धर्म नही होता...' या आईने शिकविलेल्या ब्रीदवाक्‍यावर रईस वाटचाल करीत असतो. लहान असतानाच तो चटपटीत स्वभावाचा असतो. परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे लहान असतानाच बेकायदा दारूविक्री करणाऱ्या दारूमाफियांच्या सान्निध्यात येतो आणि त्यांच्यासाठी काम करीत असतो. दारूमाफियाकडे (अतुल कुलकर्णी) सुरुवातीला तो काम करीत असतो. ते काम करीत असतानाच एके दिवशी आपण स्वतःच या धंद्यात उतरावे, अर्थात स्वतःच बेकायदा दारूविक्री करावी, असा निर्णय घेतो. सुरुवातीला त्याला काही दारूमाफियांपासून धोका निर्माण होतो. त्यातच एक सच्चा पोलिस अधिकारी अंबालाल मजुबदार (नवाजुद्दीन सिद्धीकी) याच्याशी त्याची थेट लढत होते. दोघेही आमनेसामने येतात खरे. मग रईस या सर्व गोष्टीतून कशी वाटचाल करतो... बेकायदा दारूविक्रीचा व्यवसाय करीत असतानाच राजकारण्यांशी तो कशी हातमिळवणी करतो... आपल्या मोहल्ल्यात तो गोरगरिबांची कशी मदत करतो... असा सगळा मसाला या चित्रपटात आहे. ऍक्‍शन आणि इमोशन्स याबरोबरच प्रायोगिक आणि व्यावसायिक सिनेमाचे गणित दिग्दर्शक राहुल ढोलकियाने चांगलेच जमवलेले आहे. शाहरूख आणि नवाजुद्दीन यांच्या अभिनयाची जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. नवाजच्या वाट्याला आलेले संवाद कॅची आहेत. त्यामुळे दोघांचीही कामगिरी चमकदार झाली आहे. चाणाक्ष आणि हुशार असा रईस आणि बेरकी आणि तितकाच कल्पक असा पोलिस अधिकारी... या दोन्ही व्यक्तिरेखा छान जमल्या आहेत. अतुल कुलकर्णी आणि उदय टिकेकर या दोन मराठी कलाकारांची कामगिरीही उजवी झाली आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धात अतुलने बाजी मारली आहे, तर उत्तरार्धात उदय टिकेकर यांनी फुल ऑन बॅटिंग केली आहे. चित्रपटातील संगीत अगोदरच लोकप्रिय ठरले आहे. राम संपत यांनी संगीत दिलेले "उडी उडी' हे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले आहे आणि पडद्यावरही छान चित्रित करण्यात आले आहे. "लैला मै लैला...' या गाण्यावर सनी लिऑन चांगलीच थिरकली आहे. मात्र निराशादायक कामगिरी माहिरा खानची आहे. माहिराची या चित्रपटासाठी का निवड करण्यात आली, असा प्रश्‍न तिला पडद्यावर पाहिल्यानंतर पडतो. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच एक्‍सप्रेशन्स दिसत नाहीत. शाहरूखच्या अपोझिट ती शोभत नाही. शिवाय चित्रपटाचा पूर्वार्ध चांगला जमला आहे. चित्रपट झपझप पुढे सरकत जातो. दारूमाफिया... त्यांचे अड्डे... त्यांच्यातील चढाओढ, पोलिसांची त्यांच्यावर असलेली करडी नजर आणि त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी यांनी आखलेले प्लॅन्स... या सर्व गोष्टी छान जमल्या असताना उत्तरार्धात काहीशी निराशा पदरी पडते. या चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स धक्कादायक आहे. शाहरूख खानच्या डायहार्ट फॅन्सना हा धक्का कदाचित सहनही होणार नाही. हा एक तद्दन मसालापट आहे, पण शाहरूखच्या फॅन्सना तो नक्कीच आवडेल. राहुल ढोलकियाने ऍक्‍शन आणि इमोशन्सचा चांगला संगम साधला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com