भीषण वास्तवावरंच बेधडक भाष्य : उडता पंजाब

भीषण वास्तवावरंच बेधडक भाष्य : उडता पंजाब

पाच नद्यांचा प्रदेश असलेल्या पंजाब या भारतातील समृद्ध राज्याची काळी बाजू मांडणारा, तेथील अमली पदार्थांच्या खोल गर्तेत अडकलेल्या तरुणाईचं भीषण वास्तव मांडणारा, राजकारणी आणि पोलिसांच्या युतीचं भेदक दर्शन घडवणारा, शाहीद कपूर, आलिया भट, दिलजीत दोसांझ व करिना कपूर यांच्या जबरदस्त अदाकारीनं नटलेला "उडता पंजाब‘ हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी व्यवस्थेशी पंगा घेत, अतिशय नेटक्‍या व शेलक्‍या भाषेत हा विषय मांडला आहे. ब्लॅक ह्युमरचा अतिरिक्त वापर व काहीशी संथ मांडणी या चित्रपटाच्या मोजक्‍या त्रुटी.

"उडता पंजाब‘ची कथा सुरू होते पंजाबच्या पाकिस्तानला लागलेल्या सीमेवर. अमली पदार्थाचं पाकीट भारतीय हद्दीत भिरकावलं जातं. बिहारमधून आलेल्या व हॉकीची राष्ट्रीय खेळाडू असलेल्या एका तरुणीला (आलिया भट) ते सापडतं. टॉमी सिंग (शाहीद कपूर) या रॉकस्टारच्या तालावर तरुणाई अमली पदार्थांच्या नशेत बेधुंद नाचत असते व टॉमीही या त्याच्या आहारी गेलेला असतो. तरुण पोलिस अधिकारी सरताज सिंग (दिलजीत दोसांझ) सीमेवरून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीकडं "कट‘ घेऊन डोळेझाक करीत असतो. डॉ. प्रीत सहानी (करिना कपूर) ही "वॉर ऑन ड्रग‘ची सक्रिय कार्यकर्ती तरुणांना या व्यसनापासून दूर लोटण्यासाठी मेहनत घेत आहे. टॉमी एका पार्टीमध्ये ड्रग घेताना सापडतो व तुरुंगात जातो. सरताजचा धाकटा भाऊ बाली (प्रभज्योत सिंग) अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढला जातो, तर बिहारी तरुणी अमली पदार्थांचं पाकीट नष्ट केल्यानं तस्करांच्या जाळ्यात अडकते. डॉ. प्रीत व सरताज अमली पदार्थांच्या रॅकेटची पाळंमुळं नष्ट करण्यासाठी पुढं सरसावतात, बिहारी तरुणी आयुष्य नव्यानं सुरू करण्यासाठी धडपड करते, तर टॉमीही अमली पदार्थांपासून दूर होत या लढाईमध्ये सामील होतो. या सर्वांच्या कथा एकत्र कशा येतात, पोलिस व राजकारण्यांच्या आशीर्वादानं सुरू असलेलं अमली पदार्थांचं रॅकेट उद्‌ध्वस्त होतं का, प्रीत व सरताज आणि टॉमी व बिहारी मुलीतील नातं फुलतं का अशा अनेक प्रश्‍नांच्या उत्तरांसाठी चित्रपटाच्या धक्कादायक शेवट पाहणंच श्रेयस्कर.
चित्रपटाची कथा पंजाबमधील सध्याची सत्यस्थिती मांडत गंभीर धोक्‍याची जाणीव करून देते. त्यामुळं "प्रो ऍक्‍टिव्ह‘ सिनेमा म्हणून "उडता पंजाब‘चं विशेष कौतुक व्हायला पाहिजे. चित्रपटाच्या पूर्वार्धात पंजाबमधील स्थितीचं वर्णन करताना धक्का तंत्राबरोबरच ब्लॅक ह्युमरचा सढळ वापर झाला आहे. चौबे यांनी "इश्‍किया‘ व "देढ इश्‍किया‘ या चित्रपटांमध्येही याच तंत्राचा वापर केला होता. उत्तरार्धात परिस्थिती बदलते व बिहारी तरुणी, टॉमी व सरताज आणि प्रीत संकटाच्या खोल गर्तेत अडकतात. चित्रपटाचा हा भाग तुलनेनं संथ असला, तरी त्यातील प्रत्येक प्रसंग विचारपूर्वक मांडला गेला आहे. अमली पदार्थांपासून तरुणाईनं दूर राहावं, यासाठीचा योग्य संदेश चित्रपट देतो व त्याचबरोबर या परिस्थितीला जबाबदार असलेल्या लोकांचा पर्दाफाशही करतो.
शाहीद कपूरनं "हैदर‘नंतर पुन्हा एकदा अभिनयाची कमाल दाखवली आहे. ड्रगिस्ट रॉकस्टारचा माज, चुकीची जाणीव झाल्यावर यातून इतरांना बाहेर काढण्यासाठीची त्याची जीवतोड मेहनत जमून आली आहे. आलिया भटनं तस्करांच्या जाळ्यात अडकलेली बिहारी तरुणी जिवंत केली आहे. या दोघांच्या कारकिर्दीतील या सर्वांत महत्त्वाच्या भूमिका ठराव्यात. दिलजीत दोसांझ या पंजाबी अभिनेत्याचं हिंदीतील पदार्पण धडाक्‍यात झालं आहे. करिना कपूरनं कोणतंही ग्लॅमर नसलेली भूमिका छान साकारली आहे. अमित त्रिवेदीचं संगीत आणि सर्वच गाणी श्रवणीय.

एकंदरीतच, संपूर्ण पिढीला बरबाद करू पाहत असलेल्या एका भीषण वास्तवावरचं बेधडक भाष्य असलेला हा सिनेमा प्रत्येक संवेदनशील भारतीयानं अनुभवायलाच हवा.
 

श्रेणी : 4
निर्मिती : एकता कपूर, अनुराग कश्‍यप
दिग्दर्शक : अभिषेक चौबे
भूमिका : शाहीद कपूर, आलिया भट, करिना कपूर, दिलजीत दोसांझ आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com