महापालिका हातात द्या, पुण्याचा कायापालट करतो - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

पुणे - ""नाशिकप्रमाणे महापालिका माझ्या हातात द्या, मी पुणे शहराचा कायापालट करून दाखवतो. हा प्रयोग करून बघा,'' असे सांगत मुळा-मुठा नदीकाठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविण्याचे आश्‍वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर सभेत दिले. 

पुणे - ""नाशिकप्रमाणे महापालिका माझ्या हातात द्या, मी पुणे शहराचा कायापालट करून दाखवतो. हा प्रयोग करून बघा,'' असे सांगत मुळा-मुठा नदीकाठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविण्याचे आश्‍वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर सभेत दिले. 

मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाळा नांदगावकर, शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. शिवसेना-भारतीय जनता पक्षातील भांडणे, दैनिक सामनावर बंदी घालण्याची भाजपने केलेली मागणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपने केलेला अपमान आणि नाशिकमध्ये मनसेतर्फे करण्यात आलेली विकास व सुशोभीकरणाची कामे अशा विविध मुद्‌द्‌यांवर राज ठाकरे यांनी भाष्य केले. 

ते म्हणाले, ""शिवसेना आणि भाजपच्या भांडणाचा शहरांशी काही संबंध नाही. नाशिकमध्ये 77 गुंडांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तोच त्यांचा खरा चेहरा आहे. पुण्यातला एक बिल्डर ठरवतो कोणाला काय द्यायचे ते. अशा लोकांवर तुम्ही विश्‍वास ठेवणार आहात का? गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस शहरासाठी काय केले हे सांगत नाही. त्यांच्या प्रचार फलकावर "रोजगार देऊ' अशी आश्‍वासने दिसतात. पण रोजगार देणे हे काही महापालिकेचे काम नाही. अशा लोकांना पुणेकर का जाब विचारत नाहीत?'' 

मनसेच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक करत ते म्हणाले, ""काम केल्यानंतरही जर मतदान होणार नसेल तर काम करणारे लोकही बिघडतील. पंधरा वर्षांत काय केले असा जाब पुणेकर विचारणार नसतील तर ही शहरे तुम्हालाच लखलाभ असोत. नाशिकप्रमाणे पुणे शहरही माझ्या हातात द्या. मुळा-मुठेचा काठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवून दाखवतो. चित्रपटगृहांप्रमाणे अनेक रंगमंच एकाच ठिकाणी असलेली मल्टीप्लेक्‍ससारखी नाट्यगृह निर्माण झाली पाहिजेत. पण असा नवीन विचार कोणाच्याही मनात येत नाही. आणि अशा लोकांना समाज, नागरिक प्रश्‍नच विचारायचे बंद झाले आहेत. त्याच लोकांना पुन्हा मत देणार असाल तर नंतर तक्रारही करू नका. मतदानातून बदल घडवला तर या शहराचे नशीब बदलेल.'' 

Web Title: MNS chief Raj Thackeray's assurance in pune