IT'ला डिजिटायझेशन, ऑटोमेशन, क्लाऊडचा धोका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

ट्रम्प यांच्या धोरणाचा कंपनीच्या भरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. भरतीचे प्रमाण कमी झालेच तर त्यासाठी स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वाढता वापर कारणीभूत असेल.

श्रीनिवास कंदोला

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'सुरक्षावादा'च्या धोरणापेक्षा डिजिटायझेशन, स्वयंचलित तंत्रज्ञान (ऑटोमेशन) आणि क्लाऊड या गोष्टींचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक धोका आहे, असे प्रतिपादन कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास कंदोला यांनी केले आहे.

ट्रम्प यांच्या धोरणाचा कंपनीच्या भरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. भरतीचे प्रमाण कमी झालेच तर त्यासाठी स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वाढता वापर कारणीभूत असेल असेही ते म्हणाले. कंपनीने नेहमीच स्थानिक मनुष्यबळाच्या भरतीस प्राधान्य दिले आहे. यामुळे, कंपनीचे 'एच1-बी'वरील अवलंबित्व कमी आहे. अमेरिकेने जरी यासंबंधीचे नियम कडक केले कुशल कर्मचाऱ्यांचे नेहमीच स्वागत केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बदलत्या आयामांसाठी सज्ज करण्यासाठी पंधरा लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज 'नॅसकॉम'ने व्यक्त केली होती. याविषयी बोलताना कंदोला म्हणाले की, कंपनीने सुमारे 30 टक्के कर्मचाऱ्यांना याआधीच प्रशिक्षण दिले असून येत्या दोन वर्षात हे प्रमाण 50 टक्क्यांवर जाईल.

याशिवाय, कंपनीने भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्धार कायम ठेवला असून, एप्रिलअखेरीस कर्मचाऱ्यांचा आकडा एक लाखांच्या पार जाईल असेही ते म्हणाले.

"काही आठवड्यांमध्ये आम्ही एक लाख कर्मचाऱ्यांच्या संख्येचा टप्पा पार करु. सध्या आमच्याकडे 98,800 कर्मचारी आहेत आणि एप्रिलअखेरीस हा आकडा एक लाखांवर जाईल", असे कंदोला म्हणाले. भविष्यातदेखील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा कंपनीचा मानस असून नव्या लोकांना (फ्रेशर्स) संधी देऊन त्यांना बदलते तंत्रज्ञान शिकविण्यावर भर असेल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

ताज्या आर्थिक घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा- http://www.sakalmoney.com/

Web Title: digitization, automation, cloud threat to it sector