जागृतीतून वाचविला तीन लाख पशूंचा जीव

विनायक जाधव
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

बेळगाव - प्राण्यांनाही या पृथ्वीतलावर मानवाप्रमाणेच जगण्याचा समान अधिकार आहे. हा अधिकार मिळवून देण्यासाठी ‘पेटा’सह अनेक प्राणीदया संघटना कार्यरत आहेत. त्यात विश्‍व प्राणी कल्याण मंडळाचे नावही ठळकपणे घ्यावे लागेल. विविध धर्मांचे सण, यात्रा व प्रथांमुळे कर्नाटकात दरवर्षी दीड कोटीहून अधिक प्राण्यांची कत्तल केली जाते. ही कत्तल रोखण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत ८०० हून अधिक यात्रांमध्ये शाकाहाराचा पुरस्कार करत तीन लाख पशूंचा जीव वाचविला आहे.

विश्‍व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष तसेच बसवधर्म ज्ञानपीठाचे प्रमुख स्वामी दयानंद यांनी कक्केरीतील (ता. खानापूर) बिष्टम्मा देवी यात्रेत होणारे हजारो पशुबळी रोखून जिल्ह्यात या उपक्रमाला चालना दिली. बेळगाव जिल्ह्यातील आठ यात्रांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर होणारी पशुहत्या थांबविली आहे.

मूळचे बंगळूरचे असलेले स्वामी दयानंद यांनी आतापर्यंत कर्नाटकसह आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील यात्रांमधील पशुबळी थांबविले आहेत. २०१४ मध्ये बेळगावात मुस्लिमांच्या इज्तेमा कार्यक्रमात पशुबळी होण्याचे संकेत मिळताच हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होण्याची शक्‍यता होती. त्यावेळी स्वामींनी इज्तेमा आयोजकांसोबत चर्चा करून पशुबळी थांबविला.

अनेक गायींचीही मुक्तता झाली. आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणी जागृती करून सुमारे तीन लाख पशूंचा जीव वाचविला आहे. त्यांचा उपक्रम अव्याहतपणे सुरूच आहे. आता अथणी तालुक्‍यातील कोकटनूर गावात डिसेंबरमध्ये होणाऱ्या यल्लम्मा यात्रेत तसेच फेब्रुवारीत हुक्केरीतील मोहनगा भावकेश्‍वरी यात्रेत ते पशुबळी थांबविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

जनावरांसंबंधी कायदा काय सांगतो?
- कोणत्याही प्राण्याची खुलेआम कत्तल करणे अपराध आहे. अशी कत्तल केवळ कत्तलखान्यातच केली जाऊ शकते. गर्भार जनावराची कत्तलखान्यातही कत्तल होऊ शकत नाही. 
 - स्थानिक स्वराज्य संस्थांशिवाय इतर कोणत्याही व्यक्ती मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण किंवा त्यांना मारू शकत नाही. 
- जनावरांना दुखविणे, त्यांचा छळ करणे, त्यांना अन्नापासून वंचित ठेवणे, बांधून ठेवणे यासाठी दंड व तीन महिने कारावास किंवा दोन्ही ठोठावला जाऊ शकतो. 
- प्राण्यांचा वापर मनोरंजनासाठी करण्यावर बंदी आहे. 
- वन्यप्राण्यांवर विषप्रयोग आणि इतर अत्याचारासाठी 
-  २५ हजार दंड आणि सात वर्षाचा कारावास आहे.

भारतातून होणारी मांसाची निर्यात थांबली पाहिजे. भारत अहिंसाप्रधान देश आहे. महात्मा गांधीजींनीही आयुष्यभर शाकाहाराचा पुरस्कार केला. सर्वेजना सुखीनो भवंतु म्हणणाऱ्या भारतात मग पशुबळी का दिला जातो? ते थांबविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
- स्वामी दयानंद, 
 अध्यक्ष, विश्‍व प्राणी कल्याण मंडळ

Web Title: belgaum news World Animal Day special