गुणांचे अर्धशतक ओलांडत तेलुगूचा विजय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

चेन्नई : चढाई, पकड आणि लोण असे निर्विवाद वर्चस्व राखत तेलुगू टायटन्स संघाने प्रो-कबड्डीत मंगळवारी झालेल्या सामन्यात यजमान तमीळ थलैवाज संघाचा 58-37 असा पराभव केला. त्यापूर्वी आजच्या पहिल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सने दबंग दिल्लीवर 42-22 असा एकतर्फी विजय मिळविला. 

चेन्नई : चढाई, पकड आणि लोण असे निर्विवाद वर्चस्व राखत तेलुगू टायटन्स संघाने प्रो-कबड्डीत मंगळवारी झालेल्या सामन्यात यजमान तमीळ थलैवाज संघाचा 58-37 असा पराभव केला. त्यापूर्वी आजच्या पहिल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्‌सने दबंग दिल्लीवर 42-22 असा एकतर्फी विजय मिळविला. 

तेलुगू संघाने आज आपल्या चढायांच्या जोरावर थलैवाज संघाला पुरते निष्प्रभ केले. त्यांच्याकडून राहुल चौधरी, नीलेश साळुंके, मोहसिन मंगशौलू या तिघांनी चढाईत 'सुपर टेन' कामगिरी केली. राहुलने सर्वाधिक 16 गुण मिळविले. मोहसिनने 12, तर नीलेशने 11 गुणांची कमाई केली. रोहित राणा, फरहाद मिलघार्डन यांनी बचावाची बाजू समर्थ सांभाळली.

मुळात राहुल, नीलेश आणि मोहसिनच्या तुफानी चढायांनी तमीळचा बचाव ढिसाळ केल्यावर त्यांना विजयासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. एकापाठोपाठ एक असे चार लोण देत त्यांनी विजय निश्‍चित केला. प्रतिस्पर्धी थलैवाज संघाच्या एकूण 37 गुणांपैकी 20 गुण त्यांच्या कर्णधार अजय ठाकूरचे होते. त्याने 23 चढायांत आपले आस्तित्व दाखवून दिले होते; पण त्याला अन्य एकाही खेळाडूची साथ मिळाली नाही. तेलुगूवर दिलेल्या एकमात्र लोणवर त्यांना समाधान मानावे लागले. स्पर्धेतील आव्हान कायम राखताना तेलुगूला चढाई (36-28) आणि पकडीतील (11-3) वर्चस्व नक्कीच पुढील सामन्यासाठी प्रेरक ठरेल. 

दिल्लीचे अपयश कायम 
पहिल्या सामन्यात तळात असलेल्या दिल्लीला याही सामन्यात आपली दबंगिरी दाखवता आली नाही. उलट गुजरातने त्यांच्यावर दबंगगिरी करून सहज मिळविला. दिल्लीकडून अबूफजल यानेच काय तो प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; पण गुजरातच्या चौफेर खेळापुढे त्यांच्या अन्य खेळाडूंना टिकता आले नाही. सचिन आणि रणजित या चढाईपटूंनी आपली कामगिरी चोख बजावली. या वेळी त्यांना राकेश नरवालची साथ मिळाली. गुजरातचे वर्चस्व आणि आत्मविश्‍वास इतका होता की त्यांनी अखेरच्या सहा मिनिटांसाठी आपल्या पाचही राखीव खेळाडूंना मैदानात उतरवले होते. त्यांच्या अचूक चढाया हेच त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.