विषबाधेचे महिनाभरात 23 मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नागपूर - पिकांवरील फवारणीदरम्याच्या विषबाधेमुळे होणारे मृत्यू केवळ यवतमाळ जिल्ह्यांपुरते मर्यादित नसून, या प्रकाराची व्याप्ती संपूर्ण विदर्भात असल्याची भीती गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत होती. ही भीती खरी असल्याची माहिती आता पुढे येत आहे. नागपुरातील मेडिकलमध्ये महिनाभरात 23 जणांचा विषबाधेवरील उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. यातील किमान निम्मे मृत्यू पिकांवरील वारणीदरम्यानच्या विषबाधेचे असण्याची शक्‍यता आहे. कीटकनाशकामुळे बाधा होऊन प्रभाकर मिसळ या शेतकऱ्याचा मेडिकलमध्ये मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिसळ मूळचे नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथील रहिवासी होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना येथे भरती करण्यात आले होते. विषबाधेमुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. श्‍वसन यंत्रणा निष्क्रिय झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मिसळ यांच्यावर अतिदक्षता वॉर्डात उपचार सुरू होते. सप्टेंबर महिन्यात कीटकनाशकाच्या तसेच अन्य प्रकारे विषबाधा झालेल्या 86 रुग्णांना मेडिकलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यातील 23 जण दगावले. दगावलेल्यांमध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे. दगावलेल्यांमध्ये कीटकनाशके फवारणी करताना झालेल्या विषबाधेच्या रुग्णांचा समावेश असल्याच्या माहितीला सूत्रांनी दुजोरा दिला. मेडिकलमध्ये सध्या सात जणांवर उपचार सुरू आहेत.

तीन दिवसांत तीन मृत्यू
ऑक्‍टोबर महिन्याला प्रारंभ होताच कीटकनाशकाच्या विषबाधेचे तीन दिवसांत नऊ जण मेडिकलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. यातील 3 जण दगावले असल्याची माहिती डॉक्‍टरांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली.