मालवणी सावजी! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

आदरणीय श्रीमद्‌भगवद्‌ अमितभाई शाह, 
कमळ भुवन, 11, सफदरजंग रोड, 
नवी दिल्ली. 

प्रत रवाना : श्रीश्रीश्री मदहृदमिद नमोजीहुकूम, 
7, लोक कल्याण, नवी दिल्ली. 
(अतिगोपनीय...वाचून झाल्यावर नष्ट करणे.) 

विषय : कमळात अडकलेल्या भुंग्याबाबत. 

महोदय, 

आदरणीय श्रीमद्‌भगवद्‌ अमितभाई शाह, 
कमळ भुवन, 11, सफदरजंग रोड, 
नवी दिल्ली. 

प्रत रवाना : श्रीश्रीश्री मदहृदमिद नमोजीहुकूम, 
7, लोक कल्याण, नवी दिल्ली. 
(अतिगोपनीय...वाचून झाल्यावर नष्ट करणे.) 

विषय : कमळात अडकलेल्या भुंग्याबाबत. 

महोदय, 

महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता कळस गाठला असून कालपर्यंत झालेल्या घडामोडींचा साद्यंत वृत्तांत आपणास धाडणे हे माझे कर्तव्य आहे. सदरील वृत्तांत एका 'क्ष' व्यक्‍तीच्या पक्षांतराबाबत असून सारी औपचारिकता पूर्ण झाली आहे, हे कळवावयास अत्यंत आनंद होत आहे. सदरील 'क्ष' व्यक्‍तीचे नाव घेणे मुद्दामच टाळले असून गोपनीयतेचा भंग होणार नाही, ह्याची दक्षता घेणे, हेदेखील माझे कर्तव्य ठरते. 

सदरील 'क्ष' व्यक्‍ती गेले अनेक महिने आपल्या कमळपाशात स्वत:हून अडकण्यासाठी उत्सुक होती. मध्यंतरी मी त्यांस घेऊन अहमदाबादेत येऊन गेलो होतो, हे आपल्या स्मरणात असेलच. तथापि, आपल्या समग्र कुटुंबकबिल्यासमेत कमळ पक्षात घ्यावे, हा त्यांचा कोकणी आग्रह डोईजड झाल्याने थोडा विलंब झाला. ठरल्याप्रमाणे मंगळवारी आश्‍विन वद्य तृतीयेस 'क्ष' व्यक्‍ती भेटून गेली व आता सारा कार्यक्रम ठरल्यात जमा आहे. 

बंगल्यावर येताना काळ्या काचांच्या गाडीतून यावे, तसेच वेषांतर केल्यास उत्तम अशा सूचना मी सदरील 'क्ष' व्यक्‍तीस केल्या होत्या. त्याचे तंतोतंत पालन झाल्याने सदरील व्यक्‍ती आपल्या पक्षाच्या शिस्तीत नक्‍की तय्यार होईल असा विश्‍वास वाटला. सदरील 'क्ष' व्यक्‍तीने आल्या आल्या बंगल्याच्या दारातील पोलिसाला 'मेल्या, शिरा पडो तुज्या तोंडार...दार उगड!'' असे फर्मावले. सदरील व्यक्‍तीने काळा कोट, काळा चष्मा, काळे बूट, काळे केस, काळी दाढी, आणि काळी टोपी असा वेष धारण केला होता. पोलिसाने त्यांना अदबीने 'कोण इलंय म्हणान सांगू?' असे विचारले. तेव्हा त्यांनी 'मालवणी सावजी इलाहा असा सांग' असे उत्तर दिले. पोलिसाने त्यांना आत सोडले. 

बंगल्यात प्रवेश करताक्षणी त्यांनी वेषांतर उडवले आणि मला 'काय ता फायनल सांग' असे गुरकावून विचारले. मी त्यांना त्यांच्या अटी विचारून घेतल्या. त्या येणेप्रमाणे : 1. आत्ताच्या आत्ता मला मंत्रिमंडळात घ्यावे.
2. आत्ताच्या आत्ता सहा महिन्यांनी मुख्यमंत्री करावे.
3. आत्ताच्या आत्ता अठरा महिन्यांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानपदाचा सक्षम उमेदवार म्हणून आपले नाव जाहीर करावे.
4. आत्ताच्या आत्ता 'भजे जनमन...नारायन नारायन' ही क्‍यांपेन चालू करावी.
5. आत्ताच्या आत्ता निवडणुकीनंतर पंतप्रधान करावे.
6. आत्ताच्या आत्ता आपल्या दोन्ही पुत्रांना केंद्रात गृह आणि अर्थ ही खाती देण्यात यावीत.
7. किंवा (नाहीतर) ती मी देईन!
8. आत्ताच्या आत्ता तुम्ही सर्वांनी घरी जावे!! 

...महोदय, वरील अटी आम्हाला खूप सोयीच्या आहेत, असे मी त्यांना सांगून टाकले. इतकेच नव्हे, तर पुढेमागे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीही मागणी करता येईल, असेही मी त्यांना सुचवून ठेवले. त्यांना मनातून इच्छा नव्हती. पण कोकणचा क्‍यालिफोर्निया करण्यासाठी तो एकमेव मार्ग आहे, असे मी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते राजी झाले आहेत. 

''दोन दिवसात काय तां फायनल कळव'' असे बजावून त्यांनी पुन्हा वेषांतर केले व काळ्या काचांच्या गाडीत बसून ते निघून गेले. काम फत्ते होईल असे वाटते!! बघू या!! कृपया पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन करावे ही विनंती. कळावे. आपला नम्र. नाना फडणवीस. 

ता. क. : 'क्ष' व्यक्‍ती येऊन गेल्यानंतर पाठोपाठ आपले चंदुदादा कोल्हापूरकर येऊन पुढ्यात बसले. ''अजून आठवडाभर तरी मी महसूलमंत्री राहीन का?'' असा काळजाला घरे पाडणारा प्रश्‍न त्यांनी विचारला. मी त्यांना साबुदाण्याची खीर आणि रुमाल असे दोन्ही दिले आणि सांत्त्वन केले. कळावे. आपला. नाना.