६ हजार ९६८ संस्था होणार रद्द : सहधर्मदाय आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद : हिशोबपत्र सादर न केलेल्या ६ हजार ९६८ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सह धर्मदाय आयुक्त श्रीकांत भोसले यांनी गुरुवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिली. 

औरंगाबाद : हिशोबपत्र सादर न केलेल्या ६ हजार ९६८ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सह धर्मदाय आयुक्त श्रीकांत भोसले यांनी गुरुवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिली. 

२००५ पूर्वी जिल्ह्यात ३० हजार संस्थांनी नोंदणी केली असून त्यापैकी ६ हजार ९६८ संस्थांनी हिशोब पत्र (ऑडिट रिपोर्ट) सादर केलेला नाही.  4 अधिकाऱ्यांतर्फे अशा संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे. संस्थांनी हिशोब पत्र दाखल करूनही नजरचुकीने रद्द करण्याचा यादीत संस्थांचे नाव आले असेल तर अशा संस्थांनी २३ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०१७ या कालावधीत हिशोब पत्र सादर करावा असेही सांगण्यात आले. नव्याने हिशोब पत्र सादर करण्याची संधी दिली जाणार नाही. या संस्थांमध्ये मंदिर ट्रस्ट चा समावेश नसल्याचेही श्री भोसले यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात २००५ ते २०१० या कालावधीत नोंदणी केलेल्या संस्थांनी हिशोब पत्र सादर न केल्यास त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

या संस्था डी रजिस्टर केल्याने संस्थांतील अनागोंदी कारभार होण्याला आधीच अटकाव बसणार आहे. अशा संस्थाना वेळीच पायबंद घातल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण ही कमी होईल असे भोसले यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त व्ही.0 आर. सोनुने, सहाय्यक धर्मदाय आयुक्त एस. व्ही. एच. कादरी, एस. के. मुळे, ए. एस. बडगुजर, प्रकाश जोशी उपस्थित होते.

आपली संस्था शोधण्याचे आवाहन
नोंदणी रद्द करण्यात येणाऱ्या संस्थांची यादी सहआयुक्त कार्यालयात नोटीस बोर्ड वर लावण्यात आल्या असून कार्यालयाच्या वेबसाईटवर ही अपलोड करण्यात येणार आहेत. यातून आपापल्या संस्थाची नावे शोधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.