राज्यात 722 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

9 लाख 2 हजार 35 हेक्‍टर क्षेत्रात ऊस उभा, पुणे विभागाची आघाडी

9 लाख 2 हजार 35 हेक्‍टर क्षेत्रात ऊस उभा, पुणे विभागाची आघाडी
पुणे - राज्यात उसाखालील चालू वर्षीचे क्षेत्र सरासरी 9 लाख 2 हजार 35 हेक्‍टर आहे. 722 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार आहे. बेणे, रसवंती आणि गुऱ्हाळ यांच्यासाठी ऊस जाऊन प्रत्यक्षात गाळपासाठी 649 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. राज्यात सर्वाधिक 2 लाख 94 हजार 289 हेक्‍टरवर पुणे विभागात, तर सर्वांत कमी नागपूर विभागात, 11 हजार 165 हेक्‍टरवर ऊस उत्पादन होत आहे.

राज्याचे एकूण सरासरी उसाखालील क्षेत्र 9 लाख 42 हजार 560 हेक्‍टर असून, पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात मिळून 2 लाख 94 हजार 289 हेक्‍टरवर ऊस आहे. नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मिळून 11 हजार 165 हेक्‍टरवर ऊस आहे.

'2017-18 च्या गाळप हंगामामध्ये प्रतिहेक्‍टरी 80 टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे. राज्यभरातील सर्व सात विभागांमध्ये मिळून 722 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी हंगामातील गाळपासाठी एकूण उत्पादनाच्या 90 टक्के, म्हणजे 649 लाख मेट्रिक टन उपलब्ध होणार आहे. यंदाच्या वर्षी अंदाजित साखर उतारा 11.30 टक्के राहील. त्यातून 73 लाख 39 हजार टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे,'' अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी दिली.

गाळप हंगाम 2017-18 अंदाज
लागवड झालेले ऊस क्षेत्र - 9 लाख 2 हजार हेक्‍टर
उत्पादकता - 80 टन प्रतिहेक्‍टर
गाळपासाठी उपलब्ध ऊस - 649 लाख मेट्रिक टन
साखर उतारा - 11.30 टक्के
साखर उत्पादन - 73 लाख 39 हजार टन
(स्रोत - साखर आयुक्तालय)

विभागनिहाय सरासरी ऊस उत्पादन क्षेत्र
विभाग एकूण ऊस क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

पुणे 2,94,289
कोल्हापूर 2,25,223
नगर 1,16,269
औरंगाबाद 1,07,885
नांदेड 1,32,500
अमरावती 14,704
नागपूर 11,165
एकूण 9,02,03

Web Title: pune maharashtra news sugarcane production