अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे शहर परिसरात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पुणे - 'मानधन नको दयेचे, वेतन द्या हक्काचे', "भाऊबीज नको दयेची, बोनस हवा हक्काचा', "टीएचआर आहार रद्द करा, शिजवलेला खाऊ द्या', "बुलेट ट्रेन रद्द करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या', अशा घोषणा देत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. शहराच्या विविध भागांतील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये "रास्ता रोको' करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांना सायंकाळी सोडून दिले.

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी राज्यात सर्वत्र "जेल भरो आंदोलन' केले. पुण्यात एकाचवेळी केशवराव जेधे चौक (स्वारगेट), गाडीतळ (हडपसर), शाहीर अमर शेख चौक (जुना बाजार), पिंपरी- चिंचवड, नाशिक फाटा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. समितीचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार, शैलजा चौधरी, सिंधू मोरे, सुनंदा साळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

स्वारगेट येथे "रास्ता रोको' आंदोलनात तीनशेहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी भाग घेतला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी उशिरा सोडले. पवार म्हणाले, 'राज्यातील सव्वा लाख अंगणवाड्या बंद आहेत, त्यामुळे 50 लाख बालकांना पोषक व पूरक आहार मिळालेला नाही. असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी मार्गासाठी परदेश दौरे करत आहेत. कृती समितीशी चर्चा करून तोडगा काढण्यात त्यांना रस नाही.

अंगणवाडी बंदचा 25 वा दिवस असून, एक महिना पूर्ण झाल्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.''

मुख्यमंत्र्यांसमोर मूक निदर्शने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांसमोर तोंडाला काळी पट्टी बांधून मूक निदर्शने करण्यात येतील. त्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा इशारा पवार यांनी दिला आहे.