बिकट परिस्थितीतून ‘प्रकाश’दर्शन

वैशाली भुते
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पिंपरी - आकाशाकडे झेपावणारे.. चमचमणारे, लुकलुकणारे, कलाकुसरीचे आकाशकंदील सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. पर्यावरणपूरक आणि तितकेच आकर्षक कंदील बनविण्यासाठी एचए कॉलनीतील सावंत कुटुंब दिवसरात्र झटत असते. सध्या बाजारात दिसणाऱ्या बांबू, टोपल्या, कापड, फोम, बॉलपासून बनविलेले कलाकुसरीचे डिझायनर कंदिलांचे ‘प्रणेते’ म्हणून या कुटुंबीयांचा उल्लेख केल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कंदिलांना पुणे- पिंपरी- चिंचवडबरोबरच राज्यात आणि राज्याबाहेरही मोठी मागणी आहे.

गेल्या २२ वर्षांपासून भारत सावंत आणि त्यांच्या पत्नी नलिनी यांचा आकाश कंदील बनविण्याच्या व्यवसाय आहे. कलाकुसरीचे कंदील बनवून त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे दिवाळीची चाहूल लागताच त्यांनी बनविलेले १२ ते १३ हजार कंदील राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये पोचतात. पाच इंचापासून पाच फुटांपर्यंतच्या या कंदिलांची घाऊक बाजारातील किंमत १५ रुपयांपासून सहा ते सात हजार रुपये आहे. थर्माकोलविरहित विशेषत: पर्यावरणपूरक कंदील बनविण्याची ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे. 

घरची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन सावंत दांपत्याने आर्थिक उत्पन्नाच्या शोधात २२ वर्षांपूर्वी वैविध्यपूर्ण आकाशकंदील बनविण्याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला आणि त्यांचा कंदील व्यावसायिक म्हणून प्रवास सुरू झाला. प्रारंभी केवळ कागद आणि थर्माकोलच वापर करून कंदील बनविण्याची परंपरा होती. मात्र, त्यांनी बांबूच्या टोपल्या, बॉल, आइस्क्रीमच्या काड्या, कप अशा वस्तूंपासून कंदील बनविण्यास सुरवात केली. त्यावर टिकल्या, आरसे, खडे, मोती, तरी, लेस, लटकन अशा वस्तूंचा खुबीने वापर केला. ही कलाकुसर ग्राहकांना भावली. त्यातून त्यांचा व्यवसाय विशेष बहरला. पुणे, पिंपरी- चिंचवडपुरताच मर्यादित असलेली मागणी नंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून होऊ लागली. आज सावंत कुटुंबीयांकडून कंदील खरेदी करणारे राज्य व राज्याबाहेर ३० घाऊक व्यापारी आहेत. कंदिलांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सावंत कुटुंब वर्षभर दिवसरात्र झटतात.

अशी करतात तयारी...
दिवाळी संपल्यानंतर दोन महिने हा व्यवसाय बंद राहातो. मात्र, या काळात बाजारात नव्याने दाखल झालेल्या वस्तूंचा शोध घेण्यास ते प्राधान्य देतात. गुजरात, मुंबई, नाशिक अशा बाजारपेठांमधून फिरून ते साहित्य खरेदी करतात. त्यासाठी सहा लाख रुपयांची गुंतवणूक करतात. या वस्तूंचा वापर करून ‘सॅंपल’ म्हणून कंदील बनवितात. त्यावरून ते पुढील निर्णय घेतात.

रेडियम कागदाचे कंदील
रेडियम कंदील हे यंदाचे सावंत कुटुंबीयांचे वैशिष्ट्य आहे. डिझायनर कापडापासून बनविलेल्या कंदिलांनाही विशेष मागणी असल्याचे भारत सावंत यांनी सांगितले. 

अठरा महिलांना रोजगार
कंदील व्यवसायातून सावंत यांनी अठरा गृहिणींना रोजगार उपलब्ध मिळाला आहे. घर-संसार सांभाळून महिलांना ठराविक उत्पन्न मिळावे, यासाठी ते प्रयत्नशील असतात.