अंध विद्यार्थिनींची डोळस कला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

हडपसर - स्वतःचे जीवन अंधारमय असूनही, त्याची तमा न बाळगता इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटतो. त्यामुळेच दिवाळी सणासाठी आकर्षक पणत्या रंगवणे, आकाश कंदील, भेटकार्ड आणि इतर वस्तू तयार करण्यात त्या विद्यार्थिनी दंग आहेत. ही लगबग कोथरूड येथील पुणे अंधशाळा, मुलींची येथे सुरू आहे. या वस्तूंचे दिवाळीनिमित्त भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन उद्या (शुक्रवारी) होणार आहे. 

हडपसर - स्वतःचे जीवन अंधारमय असूनही, त्याची तमा न बाळगता इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटतो. त्यामुळेच दिवाळी सणासाठी आकर्षक पणत्या रंगवणे, आकाश कंदील, भेटकार्ड आणि इतर वस्तू तयार करण्यात त्या विद्यार्थिनी दंग आहेत. ही लगबग कोथरूड येथील पुणे अंधशाळा, मुलींची येथे सुरू आहे. या वस्तूंचे दिवाळीनिमित्त भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन उद्या (शुक्रवारी) होणार आहे. 

या वस्तूंची विक्री करण्याची सोयदेखील केली आहे. संस्था दृष्टिहीन मुलींना दहावीपर्यंत शालेय शिक्षण देतेच. तसेच त्याच्यांतील क्षमता ओळखून त्याचा उत्पादक शक्तीत रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करते. यातूनच १९७९ पासून संस्थेने या मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी स्वतंत्र व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केली आहे. येथे विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या हजारो दृष्टिहीन भगिनींनी आता स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्याने आता कुटुंब व समाजावर बोझ न बनता त्या ताठ मानेने व स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. 

कार्यशाळेत आकाश कंदील, पणत्या, मेणबत्त्या, जेली कॅंडल्स, ग्रीटिंग कार्डस, बुक मेकर तसेच रिकेनिंग तर शिवणकामामध्ये नॅपकिन, डस्टर, ज्यूट पेपर्स, ज्यूट बॅग, कागदी पिशव्या आणि हस्तकलेमध्ये लोकर रुमाल, स्टोल, लूम कॅप, वेणी कॅप, मोबाईल कव्हर, मोजडी तर ज्वेलरीमध्ये स्टोन माळा, ब्रेसलेट, वायर बास्केट, राख्यासुद्धा बनविल्या जातात. याचबरोबर हातमागावर विद्यार्थिनी टॉवेल, पंचा, आसन, डस्टर, बेडशीट, नॅपकिन, कापड विणकाम करतात. या सर्व वस्तू प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

मुख्याध्यापिका वर्षा रांका म्हणाल्या, ‘‘दि पूना ब्लाइंड स्कूल अँड होम फॉर दि ब्लाइंड ट्रस्टचे अध्यक्ष अभिजित पवार, विश्वस्त मृणालिनी पवार आणि सचिव महेंद्र पिसाळ व सर्वच विश्वस्त दृष्टिहीन मुला-मुलींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी नेहमीच आग्रही असतात. नेहमीच त्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन आम्हाला मिळते.’’ 

सोमवारपर्यंत खुले
विविध आकर्षक वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता होणार आहे. प्रदर्शन सोमवार (ता. ९) पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले आहे. कोथरूड येथील गांधी भवनजवळील दि पूना ब्लाइंड स्कूल अँड होम फॉर दि ब्लाइंड ट्रस्ट संचलित पुणे अंधशाळा, मुलींची हे प्रदर्शनाचे स्थळ आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन दृष्टिहीन विद्यार्थिनी व संस्थेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.