कोण तो? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे गड. 
वेळ : आणलेली. 
काळ : ताणलेला! 
प्रसंग : तणतणलेला! 
पात्रे : नेहमीची...खणखणीत!! 

राजाधिराज उधोजीमहाराज संतापाने येरझारा घालीत आहेत. 'बेइमान, खंडोजी खोपडा, सूर्याजी पिसाळ' किंवा 'हुडका लेकाच्याला, हाणा ठोका' असे काहीबाही पुटपुटत आहेत. घरभेदी, नापाक इरादे वगैरे शब्द ऐकू येताहेत. मध्येच तळहातावर मूठ हापटत आहेत. मध्येच डोके खाजवत आहेत. मध्येच मान डोलवत आहेत...अब आगे... 

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे गड. 
वेळ : आणलेली. 
काळ : ताणलेला! 
प्रसंग : तणतणलेला! 
पात्रे : नेहमीची...खणखणीत!! 

राजाधिराज उधोजीमहाराज संतापाने येरझारा घालीत आहेत. 'बेइमान, खंडोजी खोपडा, सूर्याजी पिसाळ' किंवा 'हुडका लेकाच्याला, हाणा ठोका' असे काहीबाही पुटपुटत आहेत. घरभेदी, नापाक इरादे वगैरे शब्द ऐकू येताहेत. मध्येच तळहातावर मूठ हापटत आहेत. मध्येच डोके खाजवत आहेत. मध्येच मान डोलवत आहेत...अब आगे... 

उधोजीराजे : (ताडकन मान फिरवत) कोण आहे रे तिकडे? (शांतता. कोणीही येत नाही.) अरे कोणी आहे का तिकडे? बोलावलं तर लगेच यायला काय होतं? (तरीही शांतता.) या ना रे कोणी तरी आता!! (दरवाजाचा पडदा सळसळतो...) थांब तुला बघतोच!..(दबक्‍या पावलांनी दरवाजाशी जाऊन तलवारीचा वार करतात...) हर हर हर महादेऽऽव!! 
मिलिंदोजी फर्जंद : (विव्हळत उड्या मारत एण्ट्री...) ओय ओय ओय!! म्येलो म्येलो म्येलो!! अयायायाया....याऽऽ..! 

उधोजीराजे : (तडफेने) बेहया, बेइमान, बे...काहीतरी!! तूच होतास होय!! तरीच... 
मिलिंदोजी : (जमिनीवर लोळत) महाराजांचा विजय असो!! अयायाया!! 

उधोजीराजे : (करड्या आवाजात) बाहेर उभा राहून कान देऊन काय ऐकत होतास...आँ? 
मिलिंदोजी : (जमिनीवरून उठत) कुटं काय! कवाचा हुबा हाय की हितंच!! 

उधोजीराजे : (दरडावून) काय ऐकत होतास? बोल!! 
मिलिंदोजी : (गळ्याची चामडी चिमटीत पकडत) आईच्यान कायच नाय म्हाराज! वाईच डुलकी लागली व्हती, इतकंच... 

उधोजीराजे : (आणखी दरडावून) पहाऱ्यावर असताना डुलक्‍या देतोस? वर आपल्याच तोंडाने सांगतोस? 
मिलिंदोजी : (अजीजीने) स्टुलावर बसून कट्‌टाळा आला जी! 

उधोजीराजे : (उपरोधाने) मग गादी घालून देऊ की काय तुला!! चावट लेकाचा!! आम्हाला काही दगाफटका झाला असता म्हंजे? देऊ का तोफेच्या तोंडी!! 
मिलिंदोजी : (दिलगीर सुरात) माफी असावी! पुन्यांदा असं व्हनार न्हाई!! 

उधोजीराजे : (इकडे तिकडे बघत) बरं बरं...ते जाऊ दे. हे बघ, रात्र वैऱ्याची आहे फर्जंदा! हा महाल घरभेद्यांनी पोखरला आहे! कळलाव्या चिचुंद्य्रांचा सुळसुळाट झाला आहे!! सावध रहा!! 
मिलिंदोजी : (चिंताग्रस्त उकिडवे बसत) म्हंजी नेमकं काय झालंय म्हाराज? 

उधोजीराजे : (गंभीर चेहऱ्यानं) ह्या महालात घडलेल्या बारीकसारीक घटनाही बाहेर पडतात! कोणीतरी घरभेदी माणूस घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगतंय!! 
मिलिंदोजी : (तोंडावर हात मारत) अबाबाबौ!! ह्ये काय भलतंच!! पन आसं कोन कशापायी सांगंल? 

उधोजीराजे : (अधिक गंभीर होत) परवा इथं आमची सरदार मंडळींबरोबर बैठक झाली, त्यातली वादावादीही बाहेर पत्रकारांपर्यंत पोचली!! मागल्या खेपेला आम्हाला कोळंबीचं तिखलं खाल्ल्यामुळे... 
मिलिंदोजी : (नकारार्थी मान हलवत) नाय नाय! तिखल्याच्या टायमाला नाय! ते बटाटेवड्याच्या टायमाला!! तिखलं चांगलं पचलं हुतं म्हाराज!! 

उधोजीराजे : (वैतागून) एकूण एकच रे!! 
मिलिंदोजी : (आठवण काढून) मागल्या खेपंला येकदा संक्रांतीला तीळगूळ जाम खाल्ल्यावर- 

उधोजीराजे : (घाईघाईने) गाढवा, मुद्‌दा एवढाच की ह्या महालातल्या भिंतींना कान आहेत, आणि भिंतीचं तोंड बाहेरच्या बाजूला आहे!! कळलं? 
मिलिंदोजी : (डोकं खाजवत) वॉलपुट्‌टी करून घ्यावी का? 

उधोजीराजे : (कळवळून) माझ्याहीपेक्षा भयानक विनोद नको रे करुस!! ही वेळ विनोद करण्याची नाही!! घरच्या गोष्टी बाहेर शोधून काढणाऱ्याला हुडका आणि माझ्यासमोर हजर करा! जा!! 
मिलिंदोजी : (पंचनाम्याची वही खिश्‍यातून काढत)...लायनीपरमाने जाऊ द्या!! आपला वहीम कोनावर आहे? क्रुपया वर्नन करावे!! 

उधोजीराजे : (हनुवटीवर टिचक्‍या मारत) अंऽऽ...कोणीतरी आमचा उजवा हात म्हणवणारा, उंचपुरा, शिडशिडीत, पावरबाज, लोकांना टरकावणारा, थोरामोठ्यात उठबस असणारा, हुश्‍शार, तल्लख चलाख असा एखादा माणूसच... 
मिलिंदोजी : (ओशाळून वही मिटत)...कशापायी लाजवताय जी गरीबाला!! आमी नाय जा!! जै महाराष्ट्र.