निसर्गसंपन्न मंडणगड तालुका पर्यटनदृष्ट्या दीनच

सचिन माळी
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मंडणगड - राज्य शासनाचे धोरण पर्यटनवाढीसाठी अनुकूल असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा मंडणगड तालुक्‍याला झालेला नाही. नुकताच जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला; मात्र निसर्गसंपन्नतेने नटलेला मंडणगड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने दीनच आहे.

मंडणगड - राज्य शासनाचे धोरण पर्यटनवाढीसाठी अनुकूल असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा मंडणगड तालुक्‍याला झालेला नाही. नुकताच जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला; मात्र निसर्गसंपन्नतेने नटलेला मंडणगड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने दीनच आहे.

पर्यटनासाठीची बलस्थाने व सादरीकरणाची उत्तम संधी उपलब्ध असतानाही शासनस्तरावरून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. अधिकाऱ्यांनी अनेक वेळा पर्यटन स्थळांना भेटी दिल्या; मात्र अधिकाऱ्यांच्या सहली यापलीकडे त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

किल्ले मंडणगड, राज्य संरक्षित किल्ला हिंमतगड (बाणकोट), डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबडवे, नाना फडणवीस यांचे मूळ गाव वेळास, मौर्य व चालुक्‍यकालीन देवळांचे गाव पालवणी, पणदेरी येथील लेणी यांसह सावित्री नदीचा साठ किलोमीटरचा परिसर व समुद्रकिनारा यामुळे पर्यटकांसाठी पर्वणी आहे; परंतु ते दुर्लक्षितच आहे. याशिवाय तुळशी, चिंचाळी, पणदेरी आणि भोळवली या धरण प्रकल्पांचा परिसर पर्यटन व्यवसायासाठी अत्यंत योग्य आहे.

सह्याद्रीच्या कुशीतून खळाळत वाहत समुद्राला मिळणाऱ्या भारजा, निवळी नद्याही पर्यटनवाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. वेळास येथे कासव महोत्सवासाठी जगभरातून पर्यटक येतात; मात्र तेथेही सुविधांचा अभाव आहे. आंबडवे आदर्श संसद ग्राम योजनेचा पायाही पर्यटनासाठी आधारभूत ठरू शकतो. सी-लिंकच्या धर्तीवर बाणकोट ते बागमांडला येथे साकारत असलेला पूल पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतो.

पावसाळी पर्यटनस्थळे तालुक्‍यात विकसित होऊ शकतात. येथील जैवविविधतताही पर्यटकांना आकर्षित करू शकते; मात्र त्यासाठी ठोस प्रयत्न झालेलेच नाहीत. येथील जीवनशैली व ग्रामीण लोकजीवनाचे आकर्षणही पर्यटकांना वाटू शकते. शहरीकरणाच्या विविध समस्यांनी ग्रासलेला माणूस आज निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी खेड्यात येतो आहे. त्यामुळे मंडणगडला वीकेंड होमसाठी पसंती दिली जात आहे.

फक्त भेटी नको, कृती हवी
तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी कोणताही आराखडा बनवलेला नाही. बेरोजगार तरुणांना पर्यटनाद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम पर्यटन विकासाचे मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. त्यामध्ये पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास व पर्यटकांना सुविधा याचा विचार झाला पाहिजे.

Web Title: ratnagiri news tourism development needed in Mandangad Taluka