उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंविरुद्ध पोलिसांचीही फिर्याद

सिद्धार्थ लाटकर/ प्रवीण जाधव/ प्रमोद इंगळे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या बंगल्यातून कोणीतरी दोन गोळ्या झाडल्याचा आवाज आला आणि त्यापैकी एक गोळी खासदारांच्या एका समर्थकाच्या गाडीला लागली. तसेच यावेळी झालेल्या दगडफेकीत त्या गाडीच्या काचा फुटल्याचे, सुत्रांनी सांगितले. गोळीबाराचा आवाज आल्याने दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये पळापळ सुरू झाली. या धुमश्चक्रीदरम्यान तिघेजण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे येथील शाहुपूरी पोलिसांनी आज (शुक्रवार) दाखल केले. उदयनराजेंच्या कार्यकर्त्याच्या फिर्यादीवरून शिवेंद्रसिंहराजेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आणि शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकाच्या तक्रारीवरून उदयनराजेंसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल झाले. या परस्परविरोधी तक्रारींसह खुद्द सातारा पोलीसांनीही स्वतंत्रपणे तिसरी फिर्याद दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध दिली आहे. 

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूरूची निवासास्थानाबाहेर गुरूवारी मध्यरात्री दोन्ही नेत्यांच्या गटात धुमश्‍चक्री झाली होती. शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक ऍड. विक्रम पवार यांच्या फिर्यादीनुसार उदयनराजे भोसले, अजिंक्‍य मोहिते, विवेक जाधव, बंडा पैलवान, सनी भोसले, अमर किर्दत, रफीक शिकलगार यांच्यावर तर, उदयनराजेंचे समर्थक अजिंक्‍य मोहिते यांच्या फिर्यादीनुसार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजू भोसले, फिरोज पठाण, विनोद खंदारे, विक्रम पवार, हरी साळुंखे, दशरथ कांबळे, चेतन सोळंकी व योगेश चोरगे यांच्यावर खुनाचा प्रयत्न व गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

आणखी बातमी : साताऱ्यात राजेंविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (व्हिडिओ)

तिसरी फिर्याद शाहुपूरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर मारूती धुमाळ यांनी दिली आहे. त्यानुसार अजिंक्‍य मोहिते, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिवन रामचंद्र निकम, किरण कुऱ्हाडे, सचिन राजू बडेकर, सनी भोसले, पकंज चव्हाण, प्रितम कळसकर, मिलींद जाधव, राजू भोसले, फिरोज पठाण, विनोद खंदारे, विक्रम पवार, हरी साळुंखे, दशरथ कांबळे, चेतन सोळंकी, योगेश चोरगे, अमर किर्दत व इतर 150 ते 200 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा, शासकीय अधिकाऱ्यांचे आदेशाचे पालन न करणे, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

या धुमश्चक्रीमध्ये दोन्ही नेत्यांची निवासस्थाने असलेल्या परिसरात मोटारींची तोडफोड झाली. काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला होता. पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. 

आधीच्या वृत्तानुसार, टोल नाका व्यवस्थापनास स्थगिती मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडे रवाना झाले. दरम्यानच्या काळात साताऱ्याहून आनेवाडी टोलनाका येथे सुमारे 80 ते 90 गाड्यांच्या ताफ्यासह निघालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पोलिसांच्या विनंतीवरून शासकीय विश्रामगृह येथे थांबले. त्या ठिकाणी त्यांनी समर्थकांना टोलनाका आपलाच आहे. आपण संयम बाळगणे गरजेचे आहे. तसेच, पोलिसांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वांनी घरी जाऊ या, असे सांगितले. 

आमदारांसह सर्व गाड्या त्यांच्या सुरुची बंगल्याकडे रवाना झाल्या. त्याचवेळी आनेवाडीहून साताऱ्याकडे येणारे उदयनराजे भोसले यांनी आमदारांच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीचा सुरुची बंगल्यापर्यंत पाठलाग केला. बंगल्यासमोर जाऊन खासदारांनी गाडीतून उतरून त्यांनी आव्हान दिले, असा शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांनी केला. 

आमदारांच्या एका कार्यकर्त्याने शाब्दिक प्रत्युत्तर दिल्यावर खासदार समर्थकांनी धरपकड केली. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांचेही कार्यकर्ते आक्रमक झाले. तेही बंगल्याच्या बाहेर आल्याने दोन्ही गटांत बाचाबाची व धरपकड झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्याचे सुत्रांनी सांगितले. गोळीबाराचाही आवाज आल्याने दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये पळापळ सुरू झाली. या धुमश्चक्रीदरम्यान तिघेजण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी जमाव पांगवला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना हा प्रकार चिघळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांची जादा कुमक मोतीतळे परिसरात पाठवली. शिवेंद्रसिंहराजे यांचा सुरुची बंगला आणि उदयनराजे यांचा जलमंदिर पॅलेस येथे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. तसेच, समर्थकांना घरी जा असे सांगण्यात आले. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले शहर पोलिस ठाण्यात गेले, आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दिल्याचे सांगण्यात आले. दोन्ही बंगल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रस्त्यात पोलिस अधीक्षक पाटील पहाटे तीन वाजेपर्यंत तळ ठोकून होते. पहाटे तीन वाजता ते शाहुपुरी पोलिस ठाण्यात गेले. तिथे दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदविण्याचे काम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. पहाटे पाच वाजता ते पुन्हा घटनास्थळी आले. तिथे आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावला. 

आणखी बातमी : साताऱ्यात राजेंविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (व्हिडिओ)

या घटनेचे पडसाद शहरात उमटू नयेत यासाठी पोलिस अधीक्षकांनी रजेवर गेलेल्या सर्व पोलिसांना कामावर बोलावून घेतले. सकाळी सात वाजल्यापासून राजवाडा बसस्थानक, मुख्य बसस्थानक, तसेच शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त लावला. मोतीतळे ते सुरुची बंगला या रस्त्यात अडथळे लावण्यात आले आहेत. दोन्ही निवासस्थानांबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारींचा तपशील अद्याप अधिकृतपणे उपलब्ध झालेला नाही.