श्रमदानातून मुलांनी बनवले मैदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मानखुर्द - मोकळ्या जागेत मैदान बनवण्याच्या रहिवाशांच्या मागणीकडे पालिका प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष व मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने रहिवाशांनी श्रमदानातून लहान मुलांसाठी मैदान बनवले. मानखुर्दमधील चिकूवाडीतील रहिवासी व जनजागृती विद्यार्थी संघटनेच्या तरुणांनी एकत्र येऊन यासाठी पुढाकार घेतला. या मैदानामुळे चिकूवाडी वसाहत व परिसरातील मुलांना रग्बीचे प्रशिक्षण देणे जनजागृती विद्यार्थी संघटनेसाठी सोपे होणार आहे.

चिकूवाडी-रोमा बंजारा तांडा वसाहतीमागील उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीखालील मोकळी जागा उपयोगात नव्हती. या जागेचा वापर खेळाचे मैदान बनवण्यासाठी व्हावा, ही मागणी जनजागृती विद्यार्थी संघाने लावून धरली होती. या मोकळ्या जागेत सायंकाळी दारूड्यांची मैफल रंगत होती. त्यामुळे मैदानात जागोजागी दारूच्या बाटल्या, काचा पडलेल्या असत. अखेर रविवारी जनजागृती विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते व चिकूवाडीतील रहिवाशांनी श्रमदान करून मैदान स्वच्छ केले. या श्रमदानामुळे मुलांना रस्त्याऐवजी मैदानात रग्बी प्रशिक्षण देणे शक्‍य झाले आहे, असे मत जनजागृती विद्यार्थी संघाचे सचिव संतोष सुर्वे यांनी दिली.

प्रशासन मात्र ढिम्म...
मोकळ्या जागेचा विकास करून खेळाचे मैदान बनवण्याची रहिवाशांची व स्वयंसेवी संस्थाची मागणी आहे. संबंधित प्रशासनाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रहिवाशांनी गृहनिर्माण संस्थेच्या ताब्यातील या भूखंडाची साफसफाई करून लालमाती पसरवून खेळासाठी मैदान उपलब्ध करून दिले.