भारतीय हौशी बॉक्‍सिंग संघटनेची संलग्नता रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - भारतीय बॉक्‍सिंग महासंघास अखेर भारतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक बॉक्‍सिंगची मान्यता असतानाही भारतीय ऑलिंपिक संघटना भारतीय हौशी बॉक्‍सिंग महासंघासच अधिकृत संघटना आतापर्यंत मानत होते; मात्र आता या संघटनेची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारिणीने घेतला.

भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या सत्तासंघर्षात अभयसिंह चौटाला यांची साथ कायम ठेवण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्रन हे भारतीय हौशी बॉक्‍सिंग संघटनेची मान्यता कायम ठेवत होते. आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग संघटनेने अजय सिंग अध्यक्ष असलेली भारतीय बॉक्‍सिंग महासंघच अधिकृत संघटना आहे हे वारंवार स्पष्ट केल्यानंतरही हा निर्णय बदलला जात नव्हता.

केंद्रीय क्रीडा खात्याने भारतीय बॉक्‍सिंग महासंघास मान्यता दिली होती. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारिणीने मंजुरी दिल्यासच बॉक्‍सिंग महासंघास संलग्नता देण्यात येईल, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेने स्पष्ट केले होते. रामचंद्रन यांना अखेर विरोध करीत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारिणीने चौटाला यांच्या भारतीय हौशी बॉक्‍सिंग महासंघाची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे.

हौशी बॉक्‍सिंग महासंघाची संलग्नता २०१२ मध्येच जागतिक संघटनेने रद्द केली होती. महासंघाच्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याने हा निर्णय झाला होता. याच निवडणुकीचाही आधार घेत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने चौटाला अध्यक्ष असल्याने भारतीय ऑलिंपिक संघटनेची संलग्नता रद्द केली होती. त्याच वेळी केंद्रीय क्रीडा खात्याने हौशी महासंघाची संलग्नता रद्द केली. त्यानंतरही भारतीय ऑलिंपिक संघटना सातत्याने चौटालांच्या पाठीशी होती.