मनपा रुग्णालयातील ३०० रुग्ण महिन्याला ‘सिव्हिल’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नाशिक - शहरी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्याचे महापालिकेच कर्तव्य असताना पुरेशा सुविधा नसल्याने नाईलाजाने शहरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन त्या रुग्णालयावर ताण निर्माण होतो.

दर महिन्याला सरासरी तीनशे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने महापालिका वैद्यकीय सेवा देण्यात अपयशी असल्याचे स्पष्ट होते.

नाशिक रोड येथील बिटको रुग्णालय, कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय व पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय असे महापालिकेचे चार रुग्णालये आहेत. एकूण चारशे बेडची संख्या असलेल्या या रुग्णालयात महापालिकेकडून दर दोन ते तीन महिन्यांनी औषधे व यंत्रसामग्रीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यात बिटको रुग्णालयात दहा कोटींहून अधिक रकमेची यंत्रसामग्री खर्च करण्यात आली. एक्‍स-रे मशिन, रक्त तपासणी आदी प्रकारच्या सुविधा असल्या तरी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध नाही. तब्बल ३५ टक्‍क्‍यांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना पुरेशा वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीत. नाईलाजाने रुग्णांना जिल्हा रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागतो. जिल्हा रुग्णालयातील नोंदणींनुसार महिन्याला सरासरी तीनशे रुग्ण शहरी भागातील दाखल होत असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

महापालिका अपयशी
जिल्हा रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नियमित उपचार होत नसल्याने नाईलाजाने शहरातील गरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दररोज दाखल होतात. मुख्यत्वे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असलेल्या जिल्हा रुग्णालयात दिवसभरात शंभरहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यातील निम्मे रुग्ण शहरी भागातील असल्याने महापालिका वैद्यकीय सेवा देण्यास अपयशी असल्याचे स्पष्ट होते. दंत, कान, नाक, कान, घसा या उपचारांसाठी शहरी भागातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याचे रेकॉर्डवरून स्पष्ट होते.