महाराष्ट्रातील जातीय हिंसेमागे भाजप आणि संघ : मायावती

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जानेवारी 2018

''या हिंसाचारमागे भाजप आणि आरएसएसचा हात आहे. दलितांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ही हिंसा थांबवता आली असती. सरकारला त्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करायला हवी होती. तिथे (महाराष्ट्रात) भाजपचे सरकार आहे, त्यांनीच राज्यात हिंसा भडकवली''

(मायावती, बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा )

नवी दिल्ली : कोरेगाव भिमा हिंसाचाराच्या घटनेनंतर राजकीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काल (मंगळवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संघ आणि भाजपला निशाणा साधला. त्यानंतर आता बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती राज्यातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. ''महाराष्ट्रातील पुण्यात जातीय हिंसेच्या मागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे'', असा गंभीर आरोप त्यांनी केला.  

कोरेगाव भिमा घटनेनंतर राज्यातील काही ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजला आहे. त्यातच काल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी "कोरेगाव भिमाच्या अलिकडे असलेल्या सणसवाडी येथे झालेल्या दंगलीचे मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि घुगे हे सूत्रधार आहेत'', असा गंभीर आरोप केला होता. तसेच राहुल गांधी यांनी ''भीमा कोरेगावची घटना म्हणजे भाजप आणि संघ दलितविरोधी असल्याचे उदाहरण आहे'', असा आरोप केला होता.

त्यानंतर आता मायावतींनी भाजप आणि संघावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, ''या हिंसाचारमागे भाजप आणि आरएसएसचा हात आहे. दलितांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ही हिंसा थांबवता आली असती. सरकारला त्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करायला हवी होती. तिथे (महाराष्ट्रात) भाजपचे सरकार आहे, त्यांनीच राज्यात हिंसा भडकवली'', असे मायावती म्हणाल्या.

Web Title: marathi news national news mayawati attacks RSS and BJP on bhima koregaon violence in maharashtra