राज्य सरकार अत्यंत बेजबाबदारपणे वागले: पृथ्वीराज चव्हाण
कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. याची पूर्व कल्पना शासनाला असते. याहीवेळी ती होती. मात्र तेथे अपेक्षित पोलिस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली. तेथे येणाऱ्या लोकांना ज्या कोणी मारहाण केली त्यांना रोखता येणे शक्य होते.
कऱ्हाड : कोरेगाव भीमा येथील घटनेसंदर्भात राज्य शासन अत्यंत बेजबाबदारपणे वागले आहे. राज्यभरात जी काही परिस्थिती बिघडत आहे. त्याला राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
भीमा कोरेगाव येथील घटनेसंदर्भात चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला राज्य शासन जबाबदार असल्याचा आक्षेप घेतला.
ते म्हणाले, कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. याची पूर्व कल्पना शासनाला असते. याहीवेळी ती होती. मात्र तेथे अपेक्षित पोलिस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली. तेथे येणाऱ्या लोकांना ज्या कोणी मारहाण केली त्यांना रोखता येणे शक्य होते. मात्र तसाही प्रयत्न कोणत्याही पातळीवर झालेला दिसला नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला शासन जबाबदार आहे. जबाबदारीची जाणीव न ठेवता अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीचे आहे. त्याचा तोटा सामान्यांना होतो. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता लोकांनीही संयम ठेवावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.