‘मोफा’अंतर्गत गुन्ह्यात डीसकेंना अटकपूर्व जामीन
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्टनुसार (मोफा) दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला. या आदेशात न्यायालयाने डीएसके यांच्यावर काही अटीही घातल्या आहेत.

या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी डीएसके यांना हजर राहण्याचा आदेश करण्यासंदर्भात सरकार पक्षाने केलेली मागणी न्यायालयाने अमान्य केली. यापूर्वी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने डीएसके दांपत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी सदनिका ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार डीएसके यांच्याविरुद्ध ‘मोफा’ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. डीएसके यांच्यातर्फे ॲड. श्रीकांत शिवदे यांनी अर्जावर बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला होता. न्यायालयाने शिवदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानत अटकपूर्व जामीन मंजूर केला.